जळगाव : जिल्ह्यातील चोपडा शहरात प्रेमविवाह केल्याच्या रागातून केंद्रीय राखीव पोलीस दलातील निवृत्त जवानाने मुलीसह तिच्या पतीवर गोळीबार केला. शनिवारी रात्री ही घटना घडली. त्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर, तिचा पती गंभीर जखमी आहे. गोळीबार करणाऱ्या निवृत्त जवानाला नागरिकांनी चोप दिल्यामुळे तो देखील गंभीर जखमी झाला आहे. सासरा आणि जावई दोघांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तृप्ती वाघ (२४) हिने वडिलांच्या इच्छेविरूद्ध अविनाश वाघ (२८, रा. करवंद, ता.शिरपूर, हल्ली मुक्काम, कोथरूड, पुणे) याच्याशी दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे तृप्तीचे वडील किरण मंगळे ((४८, रा.रोहिणी, ता.शिरपूर) हे संतप्त होते. चोपडा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात शनिवारी सायंकाळी अविनाशच्या बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम होता. त्याठिकाणी तृप्ती आणि अविनाश हे दोघे पुण्याहून आले होते. तीच संधी साधून तृप्तीचे वडील किरण मंगळे यांनी रात्री दहाच्या सुमारास आधी तृप्ती आणि त्यानंतर अविनाशवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. तृप्तीचा जागीच मृत्यू झाला. अविनाशच्या पाठीत आणि हाताला गोळी लागली आहे.

अचानक गोळीबार झाल्याने हळदीच्या कार्यक्रमाला जमलेले सर्व वऱ्हाडी सैरभैर झाले. जवळच्या नातेवाईकांनी तृप्ती आणि अविनाश यांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहुन गोळीबार करणारा अर्जुन मंगळे यास पकडून बेदम मार दिला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलिसांनी धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तृप्तीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री उशिरा उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. तसेच गंभीर जखमी अवस्थेतील अविनाश आणि किरण यांना जळगाव येथे हलविण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तृप्तीची सासू प्रियंका वाघ यांच्या तक्रारीवरुन निवृत्त जवान किरण मंगळे याच्या विरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात आठवडाभरात गावठी बंदुकीतून गोळीबार झाल्याच्या तीन घटना घडल्या असून, त्यात धरणगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांचा धाक संपल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेची स्थिती बिघडल्याचा आरोप त्यामुळे होत आहे.