जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात काहीअंशी घट झाल्याचे दिसून आले होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पुन्हा बाजार उघडताच सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट नोंदवली गेली. ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.

सलग आठवडाभर किमतीत वाढ दिसून येत असल्याने सोन्याने नवीन उच्चांक गाठला. त्यानंतर गुंतवणूकदारांनी उच्च पातळीवरून नफा बुक करण्याचा निर्णय घेतला आणि सोन्याच्या किमती घसरण्यास सुरूवात झाली याशिवाय अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याचेही मूल्य घसरले. शुक्रवारी सकाळी जागतिक स्तरावरही सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली.

कॉमेक्सवरील सुरूवातीच्या व्यापारात सोने ०.०५ टक्के म्हणजेच दोन डॉलरच्या घसरणीसह ३,८६६.१० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसले. त्याचवेळी, गोल्ड स्पॉट दर ०.३९ टक्के म्हणजेच १४.८६ डॉलरच्या घसरणीसह ३८४१.७२ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसला.

तरीही आगामी काळात सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर धोरणांभोवती भू-राजकीय तणाव आणि अनिश्चितता कायम आहे. खरेदीदारांना खरेदी करण्यापूर्वी दररोज बदलणारे दर आणि स्थानिक ज्वेलर्सने आकारलेले बनावट शुल्क तसेच जीएसटी (तीन टक्के) तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

शहरात बुधवारी २४ कॅरेट सोन्याचे दर एकाच दिवसात दोन हजाराहून अधिक वाढल्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २१ हजार ७४६ रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, गुरूवारी दिवसभरात कोणतीच दरवाढ न होता २०६ रुपयांची किरकोळ घट नोंदवली गेली. त्यामुळे सोने एक लाख २१ हजार ५४० रुपयांपर्यंत खाली आले.

शुक्रवारी सकाळी ४१२ रूपयांची घट नोंदवली गेल्याने सोन्याचे दर एक लाख २१ हजार १२८ रूपयांपर्यंत घसरले. गेल्या वर्षी दसऱ्याला २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम ७८ हजार ८९८ रुपयांपर्यंत होते. त्या तुलनेत यंदा तब्बल ४२ हजाराहून अधिक दर असल्याने सोने विक्रीतून होणारी एकूण आर्थिक उलाढाल १० ते २० टक्क्यांनी कमी झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.

चांदीचे दर स्थिरच

जळगावमध्ये दसऱ्याच्या दिवशी दिवसभरात १०३० रूपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५२ हजार ४४० रूपयांपर्यंत खाली आले होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच कोणतीच वाढ अथवा घट नोंदवण्यात आली नाही. त्यामुळे चांदीचे दर स्थिर राहिले