जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत उच्चांकी दरवाढीनंतर विशेषतः सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी आणखी मोठे बदल अनुभवण्यास मिळाले. ज्यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांनाही धक्का बसला. ही स्थिती पुढे किती दिवस कायम राहते, त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतरच सोने खरेदीला बहुतेक चालना मिळू शकेल.
भू-राजकीय तणाव काहीअंशी कमी झाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याच्या मागणीत आता थोडी नरमाई आली आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १५ ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार असल्याच्या चर्चेमुळेही बाजारातील तणाव कमी झाला आहे. याचा परिणाम म्हणून सोन्याच्या किमतीमध्ये काही प्रमाणात घसरण दिसत आहे. मंगळवारी देखील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदी दोन्हीच्या दरात घट नोंदवली गेली. अमेरिकेतील सोन्याच्या बारवरील शुल्काबाबत व्हाईट हाऊसकडून स्पष्टीकरण मिळाल्यानेही सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी सांगितले. गेल्या आठवड्यातील वाढ थांबून सोन्याचे भाव आता एक टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या संभाव्य भेटीच्या बातमीमुळे रशिया-युक्रेन युद्धातील शांतता चर्चांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या घडामोडीमुळे सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीवरील आकर्षण कमी झाले आहे. सलग पाच दिवसांच्या वाढीनंतर गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला सुरुवात केल्याने सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला, असे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी सांगतले.
जळगावमध्ये शुक्रवारी अमेरिकेकडून आकारण्यात येणाऱ्या २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्काच्या प्रभावामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख चार हजार ५४५ रूपयांपर्यंत पोहोचले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी देखील तेच दर कायम राहिले. त्यामुळे सोमवारी सोन्याचे दर कुठपर्यंत जातात, त्याकडे ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांचे लक्ष होते. प्रत्यक्षात, सोमवारी सकाळी बाजार उघडल्यावर शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत सोने दरात प्रति १० ग्रॅम ८२४ रूपयांची घट नोंदविण्यात आली. ज्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख तीन हजार ७२१ रूपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर मंगळवारी ७२१ रूपयांची घट नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख तीन हजार रूपयांपर्यंत घसरले.
चांदीच्या दरात १०३० रूपयांची घट
जळगावमध्ये शुक्रवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १९ हजार ४८० रूपयांपर्यंत होते. नंतरच्या दोन दिवसात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात न आल्याचे सोमवारी चांदीचे दर स्थिरच राहिले. परंतु, मंगळवारी १०३० रूपयांची घट नोंदविण्यात आल्याने चांदीचे दर एक लाख १८ हजार ४५० रूपयांपर्यंत खाली आले.