जळगाव : गुरूपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते. आणि त्यामुळे या दिवशी सोने खरेदीसाठी ग्राहकांची सुवर्ण बाजारपेठेत मोठी गर्दी होताना दिसून येते. यंदा तर दिवसभर खरेदीचा मुहुर्त आहे. या पार्श्वभूमीवर, जळगावमधील सोन्याचे दर आणि एकूण आर्थिक उलाढालीची स्थिती, याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भारतीय वायदा आणि सराफा बाजारात गुरुवारी सोने व चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार दिसून आले. अनेक दिवस सतत घसरण झाल्यानंतर बाजारात आता स्थिरतेसह मिश्र कल जाणवू लागला आहे. सोन्यात किरकोळ घट झाली असली तरी चांदीच्या भावात थोडीशी वाढ नोंदली गेली आहे. गुंतवणुकदारांचे लक्ष सध्या अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयांवर केंद्रित आहे. २१ ते २३ ऑगस्टदरम्यान वायोमिंगमधील जॅक्सन होल येथे होणाऱ्या वार्षिक आर्थिक परिषदेत फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणातून पुढील बाजाराची दिशा स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ते महागाई नियंत्रणावर भर देतील किंवा कमकुवत बाजारपेठेला आधार देण्यासाठी पाऊले उचलतील, अशीही अपेक्षा आहे. फेड सप्टेंबरमध्ये व्याजदरात ०.२५% कपात करू शकते, असे बाजार गृहीत धरत आहे.
दरम्यान, सलग घसरलेल्या किमतींमुळे सराफा बाजारात ग्राहकांची खरेदी हालचाल वाढू लागली आहे. लग्नसराई व सणांच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या खरेदीला चालना मिळण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवू लागले आहे. सध्याचे सोन्याचे दर हे गुंतवणूक आणि खरेदीसाठी अनुकूल पातळीवर असल्याने हा काळ ग्राहकांसाठी लाभदायक संधी ठरू शकतो, असे मत जाणकारांचे म्हणणे आहे. जळगावमध्ये बुधवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख एक हजार ९७० रूपयापर्यंत होते. गुरूपुष्यामृत योगाच्या दिवशी गुरूवारी सकाळी बाजार उघडल्यावर सोन्यात ३०९ रूपयांची वाढ नोंदविण्यात आली. ज्यामुळे सोने एक लाख दोन हजार २७९ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.
सोन्याची किंमत कशी ठरवतात ?
भारतातील सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय किमती, आयात शुल्क, कर आणि डॉलर-रुपया विनिमय दर यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतात. यामुळेच सोन्याचे दर दररोज बदलत राहतात. भारतीय संस्कृतीत, सोन्याला केवळ दागिनेच नव्हे तर गुंतवणूक आणि बचतीचे एक महत्त्वाचे साधन देखील मानले जाते. लग्न आणि सणांमध्ये त्याला विशेष मागणी असते. त्यानुसार सोन्याचे दर कमी किंवा जास्त होत असतात.
चांदीत १०३० रूपयांची वाढ
जळगावमध्ये बुधवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १६ हजार ३९० रूपयांपर्यंत होते. दुसऱ्या दिवशी गुरूवारी १०३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १७ हजार ४२० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.