जळगाव : शहरातील आसोदा रस्त्यावरील मोहन टॉकीज परिसरात खासगी वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणाऱ्या केंद्रावर छापा टाकून तीन संशयितांवर शनिपेठ पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. तिघांकडून सुमारे ६१ घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले.

मोहन टॉकीज परिसरात वाहनांमध्ये घरगुती गॅसचा गैरवापर होत असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास छापा टाकला. कारवाई दरम्यान पोलिसांनी ३३ घरगुती आणि २८ व्यावसायिक, असे एकूण ६१ सिलिंडर जप्त केले. तसेच वजन काटा आणि सिलिंडरची वाहतूक करणारे वाहन हस्तगत केले. या प्रकरणी राहुल सोनवणे (२९) राकेश सोनवणे (२५, दोन्ही रा. पिवळी भिंत परिसर, जळगाव) आणि आदेश पाटील (२३, रा. मोहन टॉकीज परिसर जळगाव) यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुलीवर नोव्हेंबरमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीत अवैधरित्या गॅस भरण्याचे काम सुरू असताना, झालेल्या स्फोटात १० जण होरपळले होते. त्यापैकी सात जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. सदर घटनेला जबाबदार औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे तत्कालिन निरीक्षक दत्तात्रय निकम यांची तातडीने उचलबांगडी देखील करण्यात आली होती. तेव्हापासून पोलिसांनी सातत्याने छापासत्र राबवून वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणाऱ्या अनेकांवर कारवाई केली आहे. प्रत्यक्षात त्यानंतरही वाहनांमध्ये अवैधरित्या घरगुती गॅस भरण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.