जळगाव – खान्देशी बोलीतून जीवनाचे तत्वज्ञान सांगणाऱ्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या आसोदा येथे शासनाने २०१३ मध्ये बहिणाबाई यांच्या स्मारकाचे काम सुरु केले होते. प्रत्यक्षात, एक तप उलटूनही स्मारकाचे काम पूर्ण होऊ शकले नसल्याने जिल्ह्यातील साहित्यिकांनी या अनास्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बहिणाबाई चौधरी मराठी साहित्यातील एक विलक्षण काव्य प्रतिभा असलेल्या कवयित्री. त्यांची जयंती २४ ऑगस्ट रोजी माहेर आसोदा आणि सासर जळगाव येथे साजरी केली जाणार आहे. जळगाव शहरापासून पाच किलोमीटरवरील आसोदा येथे सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बहिणाबाईंचे आयुष्य शेत शिवार, शेतीची साधने, जनावरे आणि निसर्ग यांच्याशी एकरूप झाले होते. पाटी आणि पुस्तकाचा कधीच स्पर्श न झालेल्या कवी मनाच्या बहिणाबाईंना अक्षर ज्ञान नसतानाही शब्दांची अनमोल शिदोरी लाभली होती. काळ्या आईच्या म्हणजेच मातीच्या कुशीत वाढलेल्या बहिणाबाईंच्या ओठातून उमटणारे प्रत्येक बोल जणू कविता बनून बाहेर पडत. त्यांच्या कवितांमधून ग्रामीण जीवनातील सुख-दुःख, शेतकऱ्यांचे श्रम, स्त्री मनाची व्यथा आणि निसर्गाचे अलवार सौंदर्य, हे सर्व काही जीवंत स्वरूपात अनुभवता येते.

बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृती जपण्यासाठी आसोदा येथे त्यांचे स्मारक उभारण्याकरिता गावठाण जागेचे संपादन पूर्ण झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीमधून तत्कालिन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रयत्नांनी साडेतीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. २०१३ मध्ये सुरू झालेले स्मारकाचे काम साधारण २४ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात, शासनाने पुढे जाऊन थोर पुरूषांच्या स्मारकांसाठी निधीची तरतूद करणे बंद केले आणि त्याचा पहिला फटका आसोदा येथील बहिणाबाईंच्या स्मारकाला बसला.

आजतागायत कोणत्या ना कोणत्या कारणाने स्मारकाचे काम रखडत गेले. १२ वर्षांपूर्वी मंजूर असलेला साडेतीन कोटींचा निधी संपल्यानंतर नवीन निधी न मिळाल्याने मधल्या काळात स्मारक पूर्ण होते की नाही, त्याबद्दल शंका निर्माण झाली होती. दरम्यान, बहिणाबाई चौधरी स्मारक समितीने पाठपुरावा केल्याने गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्मारकासाठी १० कोटींचा निधी पर्यटन विकास विभागाकडून मंजूर झाला. त्यातून जेवढी कामे करता येतील ती कंत्राटदाराने केली. आता पुन्हा स्मारकाचे काम पुरेशा निधीभावी रखडले आहे. कामाच्या ठिकाणी झाडे-झुडपे आणि गवत मोठ्या प्रमाणात उगवले आहे. सद्यःस्थिती लक्षात घेता आता वाढीव निधी मिळाला तरी आणखी दोन वर्षे तरी स्मारकाचे काम पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे चित्र दिसते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी १२ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या आराखड्यात आता सुधारणा करण्याची गरज आहे. जेणेकरून आतील कामांना चालना मिळू शकेल. स्मारकाच्या रखडलेल्या कामांसह बहिणाबाईंच्या आसोदा गावातील जन्म घराचे जतन करण्यासाठी आणखी १० कोटींच्या निधीची गरज आहे. -किशोर चौधरी (अध्यक्ष, कवयित्री बहिणाबाई स्मारक समिती, आसोदा, जि. जळगाव)