जळगाव : जिल्हा सहकारी बँकेत महायुतीची सत्ता असली, तरी दगडी बँक इमारतीच्या विक्रीवरून सत्ताधारी तिन्ही पक्ष कोंडीत सापडले आहेत. राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यानंतर शिंदे गटाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही आता या प्रकरणात उडी घेतली आहे. दगडी बँक विकण्याची गरजच काय ?, असे बोलून मंत्री पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांच्या घामातून उभी राहिलेली जिल्हा सहकारी बँकेची नवी पेठेतील ऐतिहासिक शाखा ‘दगडी बँक’ म्हणून ओळखली जाते, ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शतकोत्तर परंपरा लाभलेली ही वास्तू विकण्याचा घाट विद्यमान संचालक मंडळाने घातल्याने बँकेचे ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथ खडसे यांनीही त्यास तीव्र विरोध केला आहे. परंपरेचे, वारशाचे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल पुरातन इमारतीच्या विक्रीतून कधीच होऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या भावना जुळलेल्या दगडी बँकेची ऐतिहासिक वास्तू विकण्यामागे संचालक मंडळाचा नक्की उद्देश काय आहे ? असा प्रश्न देखील आमदार खडसे यांनी उपस्थित केला आहे.

प्रत्यक्षात, खडसेंनी जोरदार विरोध नोंदविला तरी संचालक मंडळ आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर आता खडसे यांनी कमी किमतीत विकल्या जाणाऱ्या दगडी बँकेची किंमत सुमारे ६५ कोटी असू शकते, असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. दगडी बँकेची जुनी इमारत विकण्यासाठी ६५०० चौरस फूट चटई क्षेत्रासाठी सुमारे ४० हजार रुपये प्रति चौरस फूट दर निश्चित केला आहे. त्यानुसार संपूर्ण इमारतीचे एकूण मूल्य १२ कोटी आणि त्यावर अतिरिक्त १५ कोटी रूपये घेण्याचे संचालक मंडळाने यापूर्वीच ठरवले आहे. अटी-शर्ती टाकून जिल्हा बँकेने जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे संचालकांच्या बैठकीत ठरले आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे हे विरोधी पक्षाचे नेते असले तरी त्यांनी दगडी बँक इमारतीच्या विक्रीला त्यांनी केलेल्या विरोधाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्ष पाठींबा दर्शविला आहे. शेतकऱ्यांच्या भावना जुळलेल्या दगडी बँकेच्या इमारतीची विक्री जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मंडळ का करत आहे, २५ ते ३० कोटी रूपयांना दगडी बँक विकून काय होणार आहे, तुम्हाला पैशांची कडकी लागली आहे का ?, असे अनेक प्रश्न मंत्री पाटील यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे महायुतीची सत्ता असली तरी संचालक मंडळ अडचणीत आले आहे. कदाचित दगडी बँकेची विक्री प्रक्रिया त्यांना थांबवावी लागेल, असे बोलले जात आहे.