जळगाव : भुसावळ महामार्गावर टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली एसटी बस थेट टोल नाक्याला धडकली. त्यामुळे प्रवासी महिलेचा खिडकीतून बाहेर पडल्यानंतर मागील टायरखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
साराबाई गणेश भोई (४६, रा. पाडळसे, ता. यावल), असे मृत प्रवासी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावहून भुसावळकडे भरधाव वेगात जात असलेली एसटी बस नशिराबाद टोल नाक्याजवळ आली असता, अचानक तिचे पुढील एक टायर फुटले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. भरकटलेली बस टोल नाक्याजवळील एका भिंतीला धडकली. बसची धडक एवढी जोरात होती, की आतमध्ये बसलेल्या साराबाई भोई या खिडकीतून बाहेर फेकल्या गेल्या.
खिडकीतून बाहेर फेकल्या गेल्यानंतर साराबाई भोई बसच्या मागील टायरखाली आल्याने चिरडल्या गेल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. टायर फुटल्याने एसटी बस टोल नाक्याला धडकल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि टोल नाक्यावर थांबलेल्या इतर वाहनधारकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदत कार्याला सुरूवात केली.
अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदत कार्य आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने तत्काळ पुढील कार्यवाही केली. मृतदेह पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात रवाना केला. नशिराबाद पोलिसांकडून अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
