जळगाव : जिल्ह्यातील हतनूर धरणाचे दोन दरवाजे पाणलोट क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने अर्धा मीटरने उघडण्यात आले. ज्यामुळे सांडव्यातून २६४८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होऊन तापी नदी प्रवाहित झाली आहे. टंचाईला तोंड देणाऱ्या काठावरील बऱ्याच गावांना परिणामी काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
तापी नदीवरील हतनूर धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे २५५ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. प्रत्यक्षात, या धरणात २२ जूनअखेर १३९.५० दशलक्ष घनमीटर (५४.७१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या दिवसात हतनूरमध्ये जेमतेम २७.६९ टक्के पाणीसाठा होता. त्यातुलनेत यंदा परिस्थिती चांगली आहे. एक जूनपासून हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात १०० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत उपयुक्त पाणीसाठा आणि पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता, पाटबंधारे विभागाने हतनूर धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडले आहेत. अद्याप पावसाला कुठेच चांगला जोर नसल्याने जळगाव जिल्ह्यातील अन्य बऱ्याच नद्या कोरड्याठाक आहेत. मात्र, तापी नदीचे पात्र हतनूर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्यापासून खळाळत आहे.
तापी नदीवर जळगाव आणि यावल तालुक्यांच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या शेळगाव बॅरेजमध्ये गेल्या वर्षीपासून पाणी अडविण्यास सुरूवात झाली आहे. हतनूर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्यानंतर शेळगाव बॅरेजच्या उपयुक्त पाणी साठ्यातही आठवडाभरापासून वाढ झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने या बॅरेजचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडले असून, सांडव्यातून ५०४८.१४ क्सूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पाण्याची आवक वाढल्यानंतर तापी नदीच्या पात्रातून उन्हाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी सुरू राहणारी हंगामी वाहतूक देखील आता पूर्णतः थांबली आहे.