जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जळगावभोवती प्रस्तावित ४० किलोमीटरचा रिंग रोड मंजूर होऊन अनेक वर्षे लोटली आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी अजुनही झाली नसल्याने त्यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प कागदावरच आहे. दरम्यान, राज्य मार्गाचा दर्जा असलेला रिंग रोड सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून त्याच्या दुरवस्थेकडे खुद्द पालकमंत्री पाटील यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावापासून सुरू होणारा प्रस्तावित रिंग रोड फुपनगरी, ममुराबाद, आसोदा, तरसोद, नशिराबाद, कुसुंबा, मोहाडी आणि सावखेडा मार्गे पुन्हा पाळधीला जोडला जाणार होता. पाळधी ते सावखेडा दरम्यानच्या नऊ गावांना जोडणारा सुमारे ४० किलोमीटर लांबीचा रिंग रोड तयार करण्याची योजना कागदावर आणण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने सविस्तर सर्वेक्षणही पूर्ण केले होते. तसेच प्रस्तावित रिंग रोडवरील गावांना एकत्र जोडण्यासाठी राज्य मार्ग क्रमांक ३८ ची निर्मिती करण्यात आली होती. नियोजित रिंग रोडच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर जळगाव शहरातील वाहतुकीवरचा ताण कमी होईल. तसेच रिंग रोडलगतच्या गावांची कनेक्टिव्हिटी वाढेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त करण्यात आला होता.
परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने रिंग रोडसाठी प्रस्तावित रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय बनली आहे. ठिकठिकाणी रस्ता खचल्याने मोठमोठे खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णतः उखडले आहे. थोडासा पाऊस झाला तरी रस्त्यावर पाण्याची मोठी डबके साचतात आणि प्रवास करणे अत्यंत कठीण बनते. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे रस्त्याची समतलता ओळखता न आल्याने अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले आहेत. शेतीमाल घेऊन जाणारी वाहने खोलगट भागांत उलटण्यासारखे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातच वाळूने भरलेली ट्रॅक्टर आणि इतर अवजड वाहने या मार्गावरून सतत धावत असल्याने मंत्री पाटील यांच्या स्वप्नातील रिंग रोडची अक्षरशः चाळण झाली आहे.
फुपनगरी-ममुराबाद-आसोदा-तरसोद या गावांना जोडणारा जुना वहिवाटीचा रस्ता राज्य मार्गाचा दर्जा मिळालेला असला, तरी प्रत्यक्षात त्याची अवस्था एखाद्या ग्रामीण मार्गापेक्षाही अधिक वाईट झाली आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्या पूर्णपणे नष्ट झाल्या असून, दोन्ही बाजूंना काटेरी झुडपांचे अतिक्रमण वाढले आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे जाणवते. देखभाल आणि दुरुस्तीचे काम तर दूरच राहिले. या मार्गावरील लौकी नाल्यावरील पूल पूर्ण करण्यात आला असला, तरी पुलाला जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण अद्यापही झालेले नाही. पुलावरील स्लॅबची सळई उघडी पडली आहे. पावसाळ्यात नाल्यास पूर आल्यावर दोन्ही बाजुच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. फुपनगरी ते ममुराबाद रस्त्याचे काम सध्या सुरू असले, तरी त्याच्या दर्जाकडे कोणाचेही लक्ष नाही.
