जळगाव – जिल्ह्यातील रिंगणगाव (ता. एरंडोल) येथे सरपंचासह ग्रामपंचायत सदस्याला जलजीवन मिशनच्या कंत्राटदाराकडून ८० हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सरपंच भानुदास पुंडलिक मते (४४) यांच्यासह लाच प्रकरणात सहभागी ग्रामपंचायत सदस्य समाधान काशिनाथ महाजन (३८, दोन्ही रा. रिंगणगाव) आणि खासगी व्यक्ती संतोष नथ्थू पाटील (४९, रा. कल्याणेहोळ, ता. धरणगाव), अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत रिंगणगाव येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे सुमारे एक कोटी ५० लाख २३ हजार ३२१ रूपयांचे काम केले होते.

सदर कामाचे कंत्राटदाराला याआधी एक कोटी २७ लाख २३ हजार ३२१ रूपये मिळाले होते. त्यानुसार, त्यांनी जलजीवन मिशनच्या मंजूर आराखड्याप्रमाणे १८ मार्च २०२४ पर्यंत कामही पूर्ण केले. त्यानंतर कंत्राटदाराने २३ लाखांचे उर्वरित देयक मिळावे म्हणून जळगाव जिल्हा परिषदेकडे प्रकरण पाठविले. परंतु, जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेले काम ताब्यात घेण्यासाठी रिंगणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा करारनामा अपूर्ण असल्याचे त्यांचे देयक प्रलंबित ठेवण्यात आले.

दरम्यान, तक्रारदार कंत्राटदाराने रिंगणगावचे सरपंच भानुदास मते यांच्याशी संपर्क साधून हस्तांतर करारनामा देण्यासंदर्भात विनंती केली. तेव्हा सरपंच मते आणि ग्रामपंचायत सदस्य समाधान महाजन यांनी त्यांच्याकडे सुमारे एक लाख रूपयांची लाच मागितली. लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने अखेर सोमवारी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सरपंच मते आणि ग्रामपंचायत सदस्य महाजन यांच्या विरोधात लेखी तक्रार केली. त्यानुसार पडताळणी केली असता मते आणि महाजन यांनी कंत्राटदाराकडे ८० हजार रूपये लाचेची मागणी केली.

मात्र, त्यांनी ती बुधवारी स्वीकारणार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्या दिवशी कारवाई स्थगित करण्यात आली. प्रत्यक्षात सरपंच मते, ग्रामपंचायत सदस्य महाजन यांनी मंगळवारी शासकीय पंचांसमक्ष जळगाव येथील काव्यरत्नावली चौकात सापळा कारवाई दरम्यान खासगी व्यक्ती संतोष पाटील याच्यामार्फत सुमारे ८० हजाराची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक स्मिता नवघरे, उपनिरीक्षक सुरेश पाटील यांच्यासह बाळू मराठे, अमोल सुर्यवंशी यांनी सदरची कारवाई यशस्वी केली.

गेल्या महिन्यात दोन पोलिसांनी लाच घेतल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकाऱ्याला १५ हजाराची लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी लगेच लाचखोरीचे हे प्रकरण उघडकीस आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. लाचखोरीचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत.

या सर्व प्रकरणांमुळे विविध शासकीय कार्यालयांमध्ये सुरू असलेली लाचखोरी चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. त्यानंतर आता गावाचा गाडा हाकण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते सरपंच सुद्धा लाच घेताना जाळ्यात अडकताना दिसू लागल्याने नागरिकांमधूनही तीव्र चिंता व्यक्त होत आहे.