जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडे येथे घातक रसायनांपासून दूध तयार करून ते ग्राहकांना विकणाऱ्या एका तरूणाला अटक करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री केली. या प्रकरणी संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, सुमारे ८० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले आहे.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी पोषक मानले जाते. आणि त्याचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण पिण्यासाठी करतात. मात्र, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने काही दिवसांपूर्वी दूध भेसळ तपासणी मोहीम देखील राबविली होती. त्या माध्यमातून विविध ठिकाणच्या खासगी डेअरींमधीन दुधाचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले होते. या तपासणी नमुन्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतरही दूध भेसळीचे प्रकार थांबलेले दिसत नाही.
धरणगाव तालुक्यात भवरखेडा येथे सोमनाथ आनंदा माळी (३१) हा तरूण आरोग्यास अपायकारक असलेल्या रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दुध तयार करून ग्राहकांना राजरोसपणे विकत होता. त्याबाबतची माहिती जळगाव येथील अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांना मिळाली होती. त्याची खात्री करून त्यांनी धरणगाव पोलीस ठाण्याला त्याविषयी माहिती दिली. पोलीस कर्मचारी मदतीला घेऊन सोमवारी मध्यरात्री भवरखेडा येथे नियोजनबद्ध छापा टाकण्यात आला. तेव्हा सोमनाथ माळी हा रसायनांचा वापर करून दूध तयार करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली. अन्न सुरक्षा अधिकारी साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित सोमनाथ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्याजवळील सर्व रसायने जप्त करण्यात आली.
पोलीस उपनिरिक्षक संतोष पवार, हवालदार वर्षा गायकवाड तसेच धरणगाव पोलीस ठाण्यात हजर असलेले जळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत उपनिरिक्षक जितेंद्र वलटे, हवालदार रवींद्र पाटील, दीपक माळी, विष्णू बिऱ्हाडे, बाबासाहेब पाटील यांनी कारवाईत भाग घेतला. दूधातील भेसळ ही गंभीर बाब आहे. नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी दुधात भेसळ करणाऱ्या व्यक्तींविरोधात यापुढे कठोर कारवाई करण्यात येईल. त्यानुषंगाने जिल्ह्यात दूधाचे सर्वेक्षण नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी दुधात भेसळ होत असल्याचे दिसून आल्यास तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.