Gold rate Today : जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दसरा दोन दिवसांवर आला असताना मंगळवारी सोने आणि चांदीने पुन्हा मोठी झेप घेतली. दोन्ही धातुच्या दराने नवीन उच्चांक प्रस्थापित केल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
देशांतर्गत मागणीत वाढ, प्रमुख व्याजदरांमध्ये कपातीच्या शक्यता आणि भू-राजकीय अस्थिरतेमुळे सोन्याला ठोस आधार मिळत असल्याने सध्या दर उच्चस्तरावर टिकून आहेत. आगामी काळातही अमेरिकन फेडकडून व्याजदर कपातीची अपेक्षा, डॉलरमधील कमकुवतपणा, जागतिक मध्यवर्ती बँकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी तसेच किरकोळ गुंतवणूकदारांकडून वाढती मागणी, यामुळे सोन्याच्या किमतीत आणखी तेजी दिसून येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. सोन्याबरोबरच चांदीतही खरेदीची लाट दिसत असून, देशांतर्गत वायदा बाजारात सुरूवातीच्या व्यवहारात चांदीचे दर मोठ्या प्रमाणात उंचावले आहेत.
जागतिक बाजारातही मंगळवारी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. सकाळी कॉमेक्स सोन्याच्या किमती ३९.३० डॉलरने वाढून ३,८९४.५० डॉलर प्रति औंस झाल्या. स्पॉट गोल्ड ०.८४ टक्के म्हणजेच ३२.०५ डॉलरने वाढून ३,८६५ डॉलर प्रति औंस झाले. मंगळवारी सकाळी जागतिक बाजारात चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी वाढ दिसून आली आहे. कॉमेक्स चांदीचा भाव ०.५० टक्के म्हणजेच ०.२३ डॉलरने वाढून ४७.२५ डॉलर प्रति औंस झाला. स्पॉट चांदीचा भाव ०.२२ टक्के म्हणजेच ०.१० डॉलरने वाढून ४७.०३ डॉलर प्रति औंस झाला.
जळगावमध्येही सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १ लाख १९ हजार ६८६ रूपयांच्या उच्चांकावर होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १५४५ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने एक लाख २१ हजार २३१ रूपयांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला. कमी-अधिक फरकाने सातत्याने दरवाढ सुरूच असल्याने सोन्याच्या दरात गेल्या आठ दिवसांत तब्बल ५२५३ रूपयांची वाढ नोंदवली गेली आहे. दिवाळीपर्यंत सोने आणखी किती उच्चांक गाठते, त्याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
चांदीत १०३० रूपयांनी वाढ
जळगावमध्ये सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो एक लाख ५० हजार ३८० रूपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीच्या दराने एक लाख ५१ हजार ४१० रूपयांचा नवीन उच्चांक केला. चांदीच्या दरात गेल्या आठ दिवसांत सुमारे १३ हजार ३९० रूपयांची वाढ झाल्याचे दिसून आले.