जळगाव : धनत्रयोदशीच्या आधी दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या चांदीने काही दिवसात सोन्यापेक्षा जास्त नाव कमावले होते. त्यामुळे चांदीपेक्षा आपले सोनेच बरे, असे म्हणण्याची वेळी ग्राहकांवर आली होती. मात्र, धनत्रयोदशीच्या आधी शुक्रवारी रात्री उशिरा चांदीत अचानक मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना आता मनाजोगती चांदी खरेदी करता येणार आहे.
सोन्याच्या तुलनेत थोडे कमी महत्व आणि दर असणारी चांदी अलीकडच्या काळात जरा जास्तच भाव खाताना दिसून आली आहे. तशी चांदीची मागणी वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. पारंपरिकदृष्ट्या चांदीचा वापर दागिन्यांमध्ये, नाणी किंवा भांड्यांमध्ये केला जातो. पण आजच्या आधुनिक काळात चांदीचे महत्त्व केवळ सजावटीपुरते मर्यादित राहिलेले नाही. इलेक्ट्रॉनिक्स, सोलर एनर्जी, इलेक्ट्रिक व हायब्रिड वाहने, औषध निर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी लागणारे हार्डवेअर आणि ५ जी नेटवर्कसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे.
चांदी ही उत्कृष्ट विद्युतवाहक असून तिच्या जागी वापरता येईल, असा स्वस्त किंवा कार्यक्षम पर्याय आजपर्यंत उपलब्ध झालेला नाही. जगभरात निर्माण होणाऱ्या एकूण चांदीच्या मागणीपैकी जवळपास अर्धी मागणी ही औद्योगिक वापरासाठी असते. त्यामुळे चांदीचे औद्योगिक महत्त्व सातत्याने वाढत आहे. मात्र, या वाढत्या मागणीच्या तुलनेत चांदीचे उत्पादन तितके वाढलेले नाही. परिणामी, बाजारात चांदीचे मोल झपाट्याने वाढत आहे आणि गुंतवणूकदारांसाठी ती आकर्षण ठरत आहे.
जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेतही दिवाळी जवळ आली असताना, चांदीची मोठी टंचाई जाणवली. ३० हजार रुपयांच्या प्रिमियमसह विकली जात असतानाही ग्राहकांकडून चांदीची मागणी कायम राहिली. परंतु, बाजारात चांदीचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे विक्रेत्यांना ग्राहकांची मागणी पूर्ण करता आली नाही. दरम्यान दिवाळी आणि लग्नसराईच्या हंगामामुळे चांदीची पारंपरिक मागणी पुढील काही आठवड्यांतही कायम राहणार असल्याने, पुरवठ्याची कमतरता आणि वाढती औद्योगिक मागणी लक्षात घेता चांदीचे दर आगामी काळात अडीच लाखांपर्यंत जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली होती. जळगाव शहरातही धनत्रयोदशी तीन दिवसांवर असताना चांदीने जीएसटीसह सुमारे एक लाख ९० हजार ५५० रूपयांचा ऐतिहासिक उच्चांक केला होता.
मात्र, दुसऱ्याच दिवशी गुरूवारी तब्बल १० हजार ३०० रूपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचा तोरा उतरला. एक लाख ८० हजार २५० रूपयांपर्यंत चांदीचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. चांदीचे दर आणखी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त झाली. प्रत्यक्षात शुक्रवारी दिवसभरात पुन्हा १०३० वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर एक लाख ८१ हजार २८० रूपयांपर्यंत पोहोचले. आणि ग्राहकांची थोडीशी निराशाच झाली. परंतु, शुक्रवारी रात्री उशिरा बाजार बंद होईपर्यंत अचानक ११ हजार ३३० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी एक लाख ६९ हजार ९५० रूपयांपर्यंत घसरली. १५ तारखेला ऐतिहासिक झेप घेणाऱ्या चांदीच्या दरात चार दिवसातच तब्बल २० हजार ६०० रूपयांची घट झाल्याने व्यावसायिकांनी देखील सुटकेचा निःश्वास सोडला. दरात लक्षणीय घट झाल्यानंतर धनत्रयोदशीला ग्राहकांना मनसोक्त चांदी करता येईल. त्याचा सकारात्मक परिणाम चांदी विक्रीतून होणाऱ्या एकूण आर्थिक उलाढालीवर होऊ शकेल, असे जळगावमधील चांदीचे व्यापारी विश्वास लुंकड यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.