नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह मनसे आणि इतर पक्षांनी मतदान प्रक्रियेतील त्रुटींविरुध्द एकजूट दाखवित निष्पक्षपणे निवडणुका घेण्यासाठी त्रुटी दूर करण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाला केले. मतदार यादीतील घोळ आणि पारदर्शकतेसंबंधी मुद्दे विरोधी नेत्यांकडून उपस्थित करण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाबरोबर बैठक झाल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील काही मतदारसंघांमध्ये झालेल्या घोळाचे दाखले देण्यात आले. त्यात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील वाढीव मतदारांचा उल्लेख महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केल्याने नेमके नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात किती मतदान झाले होते, अखेरच्या काही तासांमध्ये वाढलेले मतदान याविषयी पुन्हा संशय व्यक्त होऊ लागला आहे.

आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेऊन त्यांना निवडणूक आणि मतदान प्रक्रियेतील अनेक चुका दाखवल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तुमच्या तक्रारी पाठविण्यात येतील, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मतदार याद्या दुरुस्तीसाठी लवकरात लवकर सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचीही बुधवारी भेट घेण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाला काही पुरावे दाखविण्यात आले. मतदार याद्यांमधील त्रुटी त्यांना दाखविण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. निवडणुकांमध्ये गैरप्रकार केले जात आहेत. परंतु, असे आता होऊ दिले जाणार नाही, असे सांगत जयंत पाटील यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले. या मतदारसंघातील घर क्रमांक ३ हजार ८२९ मध्ये ८१३ मतदार दाखवले असल्याचे सांगितले. याविषयी लेखी तक्रार केल्यावर मतदारांच्या गोपनीयतेचे कारण देत माहिती देण्यात आली नसल्याचेही पाटील यांनी नमूद केले.

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपच्या देवयानी फरांदे आणि महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) वसंत गीते हे प्रमुख उमेदवार होते. फरांदे यांनी गीते यांचा १७८५६ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी भाजप आणि ठाकरे गटातील नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलेच वाद झाले होते. एका ठिकाणी तर फरांदे आणि गीते हे समोरासमोरही आले होते. शेवटच्या दोन तासात अचानक काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. या निवडणुकीत मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा नाशिक मध्य मतदार संघात ९.२८ टक्के अधिक मतदान झाले होते.

नशिक मध्य विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांमधील घोळ राष्ट्रवादीचे (शरद पवार) जयंत पाटील यांच्यामुळे अशा प्रकारे पुन्हा चर्चेत आले आहेत.