नाशिक – मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत येथे महाशिबीर होत आहे. महाशिबिराच्या पूर्वसंध्येला शहरातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. सुमारे ५० हजार महिला मेळाव्यात सहभागी होण्याचा अंदाज आहे. त्यांना कुठल्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे.
शासनाच्या योजनांचा लाभार्थींना थेट लाभ तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार होण्यासाठी या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिटीलिंक आगाराशेजारील तपोवन मैदानात हे महाशिबीर होईल. यावेळी ५० हजार महिलांच्या उपस्थितीचे नियोजन करून भव्य जलरोधक मंडपाची उभारणी करण्यात आली. मेळाव्याच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी केली. लाडकी बहीण कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वास गेली असताना सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात अस्वस्थता पसरली.
हेही वाचा – खोक्यांमुळे राज्याला धोका, आदित्य ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर टीका
कार्यक्रमात पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून जलरोधक मंडपाची उभारणी केली आहे. काही ठिकाणी तो गळत असल्याने गळती थांबविण्याची सूचनाही करण्यात आली. मंडपाच्या सभोवताली पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने चारी खोदण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी शहरातील काही भागात अर्धा-एक तास जोरदार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले होते. शुक्रवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण आहे.
लाभार्थींना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे कक्ष उभारण्यात येत आहे. इच्छुक लाभार्थींची नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष ठेवला जाईल. मान्यवरांची बैठक, सुरक्षा व्यवस्था, व्यासपीठ, वीज पुरवठा, जनरेटर, कार्यक्रमस्थळाची स्वच्छता, स्वच्छ पेयजल, वाहनतळ, फिरती स्वच्छतागृहे, वैद्यकीय व्यवस्था, प्रथमोपचार, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, सूत्रसंचालक, सांस्कृतिक कार्यक्रम, एलईडी पडदे आदींचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा – पेसा भरतीसाठी वणीत रास्ता रोको, वाहतूक विस्कळीत
पूर्वसंध्येला पावसाची हजेरी
गुरुवारी सायंकाळी शहरातील गंगापूर रोड, कॉलेज रोड, मखमलाबाद, सिडकोसह काही भागात मुसळधार पाऊस झाला. त्याचा जोर इतका होता की, अवघ्या १० ते १५ मिनिटांत अनेक रस्त्यांना नदीचे स्वरुप आले. गंगापूर रोड, सिडकोसह अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तपोवन, अमृतधाम परिसरातही सायंकाळी साडेसातनंतर पाऊस सुरु झाला होता.
९०० बस सज्ज
कार्यक्रमात ५० हजार लाडक्या बहिणींना सहभागी करण्यासाठी तब्बल ९०० बसेसचा वापर करण्यात येणार आहे. यातील ७०० बस राज्य परिवहन महामंडळ तर २०० बसेस सिटीलिंक उपलब्ध करणार आहे. राज्य परिवहनने नाशिकमधून २५० आणि शेजारील अहमदनगर, धुळे, जळगाव जिल्ह्यातून उर्वरित ४५० बसेस मागवल्या आहेत. या कार्यक्रमामुळे शुक्रवारी नाशिक शहरासह ग्रामीण भागातील बससेवा विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे.