नाशिक : सिन्नर तालुक्यातील चास परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वनविभागाच्या सतर्क कारवाईतून बुधवारी रात्री या बिबट्याला यशस्वीपणे जेरबंद करण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

चास परिसरात बिबट्याच्या हालचाली गेल्या काही आठवड्यांपासून सुरू होत्या. शेतात आणि रस्त्यांवर बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक भीतीत होते. यामुळे शेतीची कामे आणि रात्रीच्या हालचालींवर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वनविभागाकडे सातत्याने तक्रारी नोंदवल्या होत्या. तक्रारींची दखल घेत उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल महेश वाघ, वनरक्षक आकाश रुपवते, फैजअली सय्यद, तसेच वन्यजीव बचाव पथकाचे रोहित लोणारे यांनी दोन दिवसांपूर्वी गोरक्षनाथ खैरनार यांच्या शेतात पिंजरा लावला होता. बुधवारी पहाटे या पिंजऱ्यात एक मादी बिबट्या जेरबंद झाल्याचे वनविभागाने पुष्टी केली. अंदाजे दोन वर्षांच्या वयाची ही मादी बिबट्या असल्याची माहिती वनपाल वाघ यांनी दिली. बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन महोदरी वनउद्यानात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, परिसरात अजूनही इतर बिबट्यांचे दर्शन झाल्याची माहिती स्थानिकांनी दिल्याने वनविभागाने सतर्कता वाढवली आहे. विभागाच्या पथकांनी चास परिसरात गस्त वाढवली असून, आणखी बिबट्यांच्या शोधासाठी मोहिम सुरू आहे. वनविभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळण्याचे, तसेच विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईमुळे चास आणि परिसरातील ग्रामस्थांचा तणाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी अजूनही संपूर्ण परिसरात बिबट्याच्या वावराचे सावट कायम आहे.