जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती व्हावी म्हणून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील एकीकडे भाजपला गळ घालत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा-भडगावमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका युतीच्या माध्यमातून लढलेल्या महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये इतके दिवस चांगला संवाद होता. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यापासून भाजपसह शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील बेबनाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांना जिंकून आणण्याची वेळ आल्यावर विशेषतः भाजप स्वबळाची भाषा करत आहे. त्यामुळे पायाखालची जमीन सरकलेल्या शिंदे गटात चांगलीच खळबळ उडाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती होते, तशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये का नाही ? असा प्रश्न मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच युती झाली नाही तर कार्यकर्ते मरून जातील, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
असे असताना, शिंदे गटाचे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आमदार किशोर पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. पक्षाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील युतीसाठी प्रयत्न करत असताना, त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पाटील यांनी पाऊल टाकले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली पाहिजे, हे नेत्यांचे वैयक्तिक मत आहे. मात्र, पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिंदे गट कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेची निवडणूक सवबळावर लढणार असल्याची थेट घोषणा आमदार पाटील यांनी केली आहे. पाचोऱ्यात काही वर्षांपासून शिवसेनेची (एकनाथ शिंदे) एकहाती सत्ता असताना, भाजपने सर्व विरोधकांना पक्षात प्रवेश देऊन विद्यमान आमदाराला शह देण्याच्या हालचाली अलीकडे वाढविल्या आहेत. त्यानंतर नुकतेच भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी शेतकऱ्यांच्या मदत निधीत झालेल्या घोटाळ्यावर सोयीस्कर मौन बाळगल्याचा आरोप करून शिंदे गटाचे आमदार पाटील यांनी लक्ष्य केले.
या पार्श्वभूमीवर, माझ्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढणारी बहीण वैशाली सूर्यवंशी, दिलीप वाघ, प्रताप पाटील आणि अमोल शिंदे यांच्या बरोबर राहून मी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढू शकत नाही. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांकडून मृत्यू ओढवून घेण्यापेक्षा समोरून त्यांच्याशी लढणे केव्हाही चांगले. किमान सावध तरी राहता येईल, असेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे. गेल्या दोन पंचवार्षिकपासून माझ्या विरोधात लढणाऱ्यांनी पाहिले की, स्वतंत्रपणे लढून आपण किशोर पाटलाला थांबवू शकत नाही. आता शेवटचा प्रयत्न म्हणून सर्व विरोधक मला थांबविण्यासाठी एकत्र आले आहेत. परंतु, पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनता माझ्याशी पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे आणखी दुसरे कोणी आले तरी मला थांबवू शकणार नाही, असा दावा देखील आमदार किशोर पाटील यांनी केला.