नाशिक – सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता पद भरतीत गुणांसह निवड यादी जाहीर करणाऱ्या महापारेषण कंपनीने सहायक कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी अभियंता पदांच्या मुलाखतीस पात्र ठरलेल्यांच्या यादीत मात्र गुण गुलदस्त्यात ठेवल्याने परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. साशंकता दूर करण्यासाठी गुणांसह यादी जाहीर करण्याची मागणी सबऑर्डिनेट इंजिनिअर संघटनेने केली असताना कंपनीने अंतिम निवड यादी गुणांसह जाहीर होईल, असा दावा केला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने गतवर्षी अभियंत्यांच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. यात कार्यकारी अभियंता २५ आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता (प्रेषण) १३३ पदांचाही समावेश होता. यात लेखी परीक्षांच्या निकालात दुजाभाव झाल्याची परीक्षार्थींंची तक्रार आहे. काही पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी गुणांसह प्रसिद्ध झाली. परंतु, सहायक कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी अभियंता पदांच्या मुलाखतीस पात्र ठरलेल्यांच्या यादीत गुणांचा उल्लेख टाळला गेला. मनुष्यबळ विकास विभागाच्या घोळामुळे आधीच काही विषय न्यायप्रविष्ठ झाल्याकडे कार्यरत अभियंत्यांनी लक्ष वेधले आहे. उपरोक्त परीक्षेसाठी महापारेषणमधील ज्यांनी मेहनत घेतली, ते देखील अपात्र ठरले. व्यवस्थापनाविरोधात भूमिका कशी घ्यायची म्हणून अनेक जण मौन बाळगून आहेत.

११ वर्षापूर्वीच्या भरती प्रक्रियेत असाच प्रकार घडला होता. तेव्हा गुण न दर्शविता निकाल जाहीर झाले होते. त्यामुळे काही परीक्षार्थींवर माहितीचा अधिकार कायद्याच्या आधारे स्वत:चे गुण जाणून घेण्याची वेळ आली होती. महापारेषणला पुन्हा तशी दमछाक अपेक्षित आहे का, असा प्रश्न परीक्षार्थी करतात. भरतीत पारदर्शकता राखण्यासाठी गुणांसह निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. तसे न घडल्याने संभ्रम वाढल्याची त्यांची तक्रार आहे.

महापारेषणने सर्व पदांचे निकाल गुणांसह जाहीर करायला हवेत. या संदर्भात संघटना व्यवस्थापनाकडे आग्रही भूमिका घेईल. विभागांतर्गत बढती समिती जाहीर केली जात नाही. महावितरणमध्ये २०१८ पासून थेट भरती झालेली नाही. दरवर्षी विशिष्ट कोटा असतो. भरतीअभावी पदे रिक्त आहेत. परिणामी, कार्यरत अभियंत्यांची बढती देखील रखडली आहे. – लक्ष्मण राठोड (अध्यक्ष, सबऑर्डिनेट इंजिनिअर असोसिएशन)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहायक कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी अभियंता पदांसाठी मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. मुलाखत, कागदपत्रे पडताळणी आदी प्रक्रिया झाल्यानंतर अंतिम निवड यादी गुणांसह जाहीर होईल. – मंगेश शिंदे (प्रमुख महाव्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, महापारेषण)