जळगाव – जिल्हा केळी उत्पादनासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे केळी निर्यातीसाठी मोठी संधी उपलब्ध असताना, त्यासाठी आवश्यक पर्यावरणीय प्रणाली उभारणे काळाची गरज आहे. त्यादृष्टीने इच्छुकांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरतर्फे मार्गदर्शन आणि संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र माणगांवे यांनी येथे दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र माणगांवे यांचे स्वागत तसेच जिल्ह्यातील उद्योग आणि व्यापार वृद्धीविषयक अपेक्षा, मार्गदर्शन आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना जळगावमधील केळी निर्यातीला चालना देण्याची गरज मानगावे यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील प्रत्येक गावातून किमान पाच व्यक्तींची उद्योग सुरू करण्यासाठी निवड करावी. त्यापैकी एक व्यक्ती जरी यशस्वी उद्योग उभा करू शकली, तरी जिल्ह्यात हजारो नवे उद्योजक निर्माण होऊ शकतील. उद्योग उभारण्यासाठी इच्छुक तरूणांना चेंबरच्या माध्यमातून आवश्यक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाईल. देश महासत्ता व्हायचा असेल तर लघु उद्योग आणि उद्योजकांना शासन आणि समाजाने पोषक वातावरण तयार करून द्यावे. उद्योग क्षेत्राचा पाया मजबूत झाला तरच आर्थिक विकासाचा वेग वाढेल, असेही मत रवींद्र माणगांवे यांनी व्यक्त केले.

जळगाव जिल्हा शेती व्यवसायात अग्रेसर असल्याने आगामी काळात शेतीपूरक उद्योग उभारणीस मोठ्या संधी उपलब्ध आहेत. डाळ मिल ,चटई आणि विविध लघु उद्योग देखील मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. वाहतुकीच्या सोयी आणि चांगली दळवळण सुविधा असूनही औद्योगिक विकास अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. नवीन उद्योजकांना औद्योगिक वसाहतीमध्ये जागा उपलब्ध नाहीत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घोषणा केल्यानुसार नवीन औद्योगिक वसाहत उभारणीत पुढाकार घेण्यात येत आहे.

तसेच जिल्ह्यात शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने, निर्यातीची मोठी क्षमता आहे. गोल्ड सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून जळगाव शहराचा सर्वांगीण विकास साधता येईल. चेंबरतर्फे बिझनेस फोरम सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याचा विविध उद्योगांना निश्चितच फायदा होईल, अशी आशा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या उपाध्यक्षा संगि‍ता पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, राष्ट्रीय समन्वयक वेदांशू पाटील, गव्हर्ननिंग कौन्सिल सदस्य दिलीप गांधी, जिंदा संघटनेचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, लघू उद्योग भारतीचे सचिव सचिन चोरडिया, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष श्याम अग्रवाल, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल झंवर, चोपडा औद्योगिक वसाहतीचे संजय जैन, अश्विनकुमार परदेशी, धनराज कासट, महेंद्र रायसोनी, अरविंद दहाड, विनोद बियाणी, किरण बच्छाव आदी उपस्थित होते. सरिता खाचणे यांनी सूत्रसंचालन केले.