नाशिक – शिक्षक संघटनांनी पुरेपूर विरोध करुनही कोणताच उपयोग न झाल्याने अखेर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार आहे. परीक्षेची काठिण्य पातळी अधिक असल्याने शिक्षकांकडून या परीक्षेला विरोध करण्यात येत होता. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांना या परीक्षेचा काय उपयोग, असाही प्रश्न करण्यात येत होता. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती. परंतु, कशाचाच काही उपयोग झाला नाही.
महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवी वर्गांवर नियुक्ती असलेल्या शिक्षकांना टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा देणे अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर रोजी सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्तीची करण्याचा निर्णय दिल्याने त्याविरोधात सर्व शिक्षक संघटना एकवटल्या होत्या. महाराष्ट्र राज्य कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टीईटी सक्तीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली होती.
शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुध्द महाराष्ट्र सरकारच्या वतीने पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचे आश्वासन शिक्षक संघटनांना दिले होते. परंतु, राज्य सरकारतर्फे कोणत्याही हालचाली करण्यात न आल्याने टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शिक्षकांना अभ्यास करावा लागला. या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून १९ हजारांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत.
देशातील शासकीय आणि खासगी शाळांमधील ५३ वर्षांपर्यंतच्या शिक्षकांना टीईटी परीक्षा देणे सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केले आहे. त्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. वर्षातून एकदाच टीईटी परीक्षा होत असते. त्यानुसार २३ नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा होणार आहे. टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांना नोकरी सोडावी लागणार आहे. आतापर्यंत टीईटी उत्तीर्णतेचे प्रमाण केवळ तीन ते चार टक्के राहिले आहे. परीक्षेची काठिण्य पातळी कडक असल्याने त्याचा निकालावर परिणाम होतो. त्यामुळेच शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) चार लाख ७५ हजार ६६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नाशिकमध्ये ५४ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून केंद्र संचालक आणि उपकेंद्र संचालकांना या कालावधीत रजा घेण्यास मनाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. परीक्षा व्यवस्थितरित्या पार पडावी, यासाठी केंद्रसंचालक व उपकेंद्र संचालक असे ५४ जण नियुक्त करण्यात आले आहेत.
नाशिक शहरातील परीक्षा केंद्रांवर नियुक्त केंद्र संचालक आणि उपसंचालकांना याआधीच या परीक्षेच्या कामकाजासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानुसार त्यांना परीक्षेचे कामकाज पाहणे बंधनकारक असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नमूद केले आहे. परीक्षेच्या दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबरला आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे २२ नोव्हेंबरला केंद्र संचालक आणि उपकेंद्र संचालकांना रजा घेता येणार नाही.
परीक्षेसाठी चार लाख ७५ हजार ६६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. प्राथमिक शिक्षकांसाठी पेपर-१ साठी २ लाख ३० हजार ३३३ जणांनी नोंदणी केली आहे. माध्यमिक स्तरावर शिक्षक म्हणून पात्र होण्यास आवश्यक पेपर-२ साठी २ लाख ७२ हजार ३३५ जणांनी नोंदणी केली आहे. परीक्षार्थीची संख्या वाढल्याने परीक्षा केंद्रांची संख्या यंदा वाढली आहे. नाशिकमधील विविध शाळा, महाविद्यालयातील ५४ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
