मालेगाव : भाजपच्या मार्गावर असलेले बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांचा पक्षप्रवेश होण्यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी भाजपमध्ये घाईघाईत उडी मारण्याचा निर्णय घेतला. यामुळे मालेगाव तालुक्यात भाजपमध्ये बड्या नेत्यांची अक्षरशः गर्दी झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कुणीच बडा नेता नसल्याने ठाकरे गटात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी बच्छाव यांना ठाकरे गटात जाण्याचा पर्याय राजकीयदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरु शकतो का,अशा चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात आता सुरू झाल्या आहेत. या संदर्भात स्वतः बच्छाव यांनी मोठे विधान केले आहे.
शिंदे गटाचे नेते व शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे खंदे समर्थक म्हणून बच्छाव यांची ओळख होती. अनेक वर्षे भुसे यांच्या सोबत काम केल्यावर दोघांमध्ये बिनसले. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांशी अंतर राखत बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या माध्यमातून बच्छाव यांनी समाज कार्य सुरु ठेवले. दरम्यान,गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्छाव हे अचानक शिवसेना उद्धव ठाकरे गटात सक्रिय झाले. मालेगाव बाह्य मतदार संघात ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न देखील केले होते.
माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे पुत्र तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांनी बच्छाव यांच्या आधीच म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यावर भाजपचा त्याग करून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानिमित्त मालेगाव येथे झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षप्रमुख खुद्द उद्धव ठाकरे यांनी दादा भुसे यांच्या विरोधात अद्वय यांची उमेदवारी जाहीर करून दिली होती. मात्र, हा प्रवेश झाला न झाला तोच जिल्हा बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी हिरे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात अद्वय हिरे यांना जवळपास नऊ महिने तुरुंगात काढावे लागले.
हिरे तुरुंगात असल्यामुळे भुसे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून बच्छाव यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा रंगली असतानाच निवडणुकीच्या तोंडावर हिरे यांची जामीनावर मुक्तता झाली. नंतरच्या घडामोडींत मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात शिंदे गटाचे दादा भुसे, ठाकरे गटाचे अद्वय हिरे व अपक्ष बंडूकाका बच्छाव असा तिरंगी सामना रंगला. या निवडणुकीत भुसे यांनी दणदणीत विजय मिळवला. बच्छाव हे दुसऱ्या स्थानी राहिले तर हिरे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
मालेगावात या आधी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे,ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे हे भाजपात दाखल झाले आहेत. बच्छाव हे देखील या महिन्याच्या अखेरीस भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले आहे. बच्छाव यांचा प्रवेश होण्यापूर्वीच अद्वय हिरे यांचा मंगळवारी मुंबई येथे भाजप प्रवेश होत असल्याचे अचानकपणे समोर आले. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील भाजपमध्ये बड्या नेत्यांची एक प्रकारे गर्दी उसळणार असल्याचे अधोरेखित होत आहे. दुसरीकडे अद्वय हिरे सोडून गेल्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडे कुणीच बडा नेता राहिलेला नाही. त्यामुळे आगामी राजकीय स्थितीचा विचार करता बच्छाव यांच्या दृष्टीने भाजपमध्ये जाण्याऐवजी ठाकरे गटाचा पर्याय स्वीकारणे अधिक फायदेशीर ठरु शकेल का, याविषयीच्या चर्चा आता तालुक्यात रंगल्या आहेत. तसेच हिरे यांच्या प्रवेशानंतरही भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयावर बच्छाव ठाम राहाणार आहेत का, अशी शंका देखील उपस्थित होत आहे.
बच्छाव यांनी मात्र या सर्व चर्चांना काहीच अर्थ नाही, असे म्हणत ठरल्याप्रमाणे आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्यांनी आपल्याला स्वतःहून बोलावून घेतले होते. पक्षात सक्रिय व्हा, उमेदवारी देतो असा शब्द त्यांनी दिला होता. मात्र हे नेते शब्दाला टिकले नाहीत, त्यामुळे अशा पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना बच्छाव यांनी नमूद केले आहे.
