मालेगाव : येथील व्यंकटेश सहकारी बँकेत बोगस कर्ज प्रकरणे करून दोन कोटी १४ लाखाचा घोटाळा केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजीमंत्री प्रशांत हिरे, त्यांचे दोन्ही पुत्र माजी आमदार अपूर्व हिरे आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) उपनेते अद्वय हिरे अशा तिघांना अटकपूर्व जामीन देण्यास मालेगाव न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे अटकेची टांगती तलवार असलेल्या हिरे पिता-पुत्रांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती या नाशिक जिल्ह्यातील दोन प्रमुख शिक्षण संस्थांवर हिरे कुटुंबियांचे वर्चस्व आहे. या संस्थांमधील २५ शिक्षकांची व्यंकटेश बँकेत बोगस कर्ज प्रकरणे करून ही रक्कम परस्पर लाटण्यात आल्याची तक्रार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल आहे. ही बँक देखील हिरे कुटुंबियांशी संबंधित आहे. या २५ पैकी एक असलेले विलास पगार या शिक्षकाच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात हिरे कुटुंबियांनी येथील अपर व जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. या अर्जावरील सुनावणीत हिरे कुटुंबियांच्या वतीने ॲड. खालिद अख्तर यांनी युक्तिवाद करताना राजकीय आकसातून हा गुन्हा दाखल झाल्याने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती न्यायालयाला केली. तर, दाखल झालेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने हा अर्ज मंजूर करू नये, असा आग्रह फिर्यादी पक्षाचे ॲड. ए. वाय. वासिफ यांनी धरला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती पाटील यांनी तिघा संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळला.