मालेगाव : एका पित्याने आपल्या चार वर्षीय मुलीला येथील गिरणा नदीच्या पूर पाण्यात टाकल्यावर स्वतःही या पाण्यात उडी घेतल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. सुदैवाने तेथून जवळच असलेल्या काही धाडसी तरुणांनी क्षणाचाही विलंब न लावता नदीत उड्या मारत पाण्यातून बाहेर काढल्याने या बाप-लेकीचे प्राण बचावले. कौटुंबिक कारणास्तव या पित्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

अश्विन जाजवट (३०, कलेक्टर पट्टा सोयगाव) असे या पित्याचे नाव आहे. रविवारी तेजस्विनी या आपल्या चार वर्षीय मुलीला सोयगावहून टेहरे गावाकडे जाणाऱ्या पुलावर अश्विन घेऊन गेला. चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे सध्या गिरणा नदीला पूर आलेला आहे. अश्विन याने कुठलाही विचार न करता तेजस्विनीला या पाण्यात फेकून दिले. पाठोपाठ स्वतःही पुलावरून पाण्यात उडी घेतली.

नदीचे पात्र खोल तसेच पूर पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही पाण्यात वाहू लागले. त्याचवेळी येथून जवळच असलेले गणेश कुंड बघण्यासाठी जाणाऱ्या श्याम सोनवणे, रोहित गायकवाड, लखन थोरात, विजू गायकवाड, श्याम गायकवाड व राहुल वाघ या टेहरे येथील तरुणांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी धावत जाऊन तत्काळ पाण्यात उड्या घेऊन बचाव कार्य सुरू केले. काही अंतर पोहत गेल्यानंतर या बाप लेकीला पाण्याबाहेर काढण्यात या तरुणांना यश आले.

घटनेची माहिती मिळताच मालेगाव महानगरपालिकेचे अग्निशामक दल तसेच छावणी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या दोघांना तातडीने सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या बालिकेला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले असून अश्विन यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पत्नी मुलीकडे नीट लक्ष देत नाही, या कारणावरून कौटुंबिक वाद झाल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची प्रथमदर्शनी शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली. परंतु ,यामागे आणखी काही वेगळे कारण आहे किंवा कसे याचा पोलीस शोध घेत आहेत.

अश्विन हा मजूर असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी उसळली. या बाप-लेकीला पाण्याबाहेर काढून मदत कार्य करणाऱ्या तरुणांनी रस्त्यावर आणले. यावेळी बचावलेल्या चिमुरडीचा निरागस चेहरा बघून उपस्थित हळहळले. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या तरुणांनी प्रसंगावधान राखत आणि जीवाची पर्वा न करता मदत कार्य करताना जे धाडस दाखवले, त्यामुळेच या बापलेकीचे प्राण वाचू शकले. या तरुणांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.