मालेगाव : ‘कायद्याचा जिल्हा,नाशिक जिल्हा’ या भयमुक्त जिल्हा मोहिमेच्या अंतर्गत गुन्हेगारी निर्मूलनाच्या उद्देशाने जिल्हा पोलीस दल सरसावले आहे. त्या माध्यमातून पोलीस दलाकडून रोजच नवनवीन कामगिरी बजावली जात आहे. त्याचाच भाग म्हणून मालेगाव येथे अंमली पदार्थांची (एमडी पावडर) तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत तिघा तस्करांना अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांनी अवैद्य व्यवसायांचे उच्चाटन करणे आणि गुन्हेगारीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील पोलिसांना आदेशित केले आहे. त्यानुसार जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाणी सतर्क झाली आहेत. मालेगावच्या हिरापूरा मैदान परिसरात काही इसम अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आल्याची गुप्त माहिती येथील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकून तीन तस्करांना रंगेहात पकडण्यात यश मिळविले. या तस्करांकडे १९४ ग्रॅम वजनाची एमडी पावडर मिळून आली. या मालाची किंमत ५ लाख ८२ हजार २०० रुपये इतकी असून विक्री करण्याच्या उद्देशाने ही पावडर त्यांनी आपल्या कब्जात बाळगल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

अन्सारी इस्तियाक मुख्तार अहमद (२५,हुडको कॉलनी), जलाल अहमद मोहम्मद हनीफ शेख (३२, नुमानी नगर), मोहसीन खान जैनुलाब्दिन पठाण (३७, गुलशन नगर) अशी अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत. परवेझ गोवंडी नामक तस्कर मात्र पोलिसांना हुलकावणी देत फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फरार झालेला गोवंडी याने सदर अंमली पदार्थ उपलब्ध करून अन्य तिघांकडे विक्रीसाठी दिल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

याप्रकरणी येथील किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पकडलेल्या तिघा तस्करांना अटक करण्यात आली आहे. परवेझ गोवंडी याने हे अंमली पदार्थ कुठून उपलब्ध केले तसेच यात आणखी कुणाचा सहभाग आहे का,याचाही पोलीस आता शोध घेत आहेत. किल्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पोलीस अंमलदार दिनेश शेरावते, सचिन बेदाडे, राकेश जाधव, अक्षय चौधरी, राम निसाळ, पंकज भोये, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम व नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.