मालेगाव : येथील कॅम्प पोलिसांनी दोन चोरांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. १४ जुलै रोजी कॅम्प पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना शुक्रवारी संबंधित दुचाकी चोर सोयगाव परिसरातील डीके चौक भागात चोरीची दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचला असता भाऊसाहेब चव्हाण (३६, सोयगाव) हा त्यात अलगद सापडला. त्याच्या ताब्यात असलेल्या दुचाकी संदर्भात विचारणा केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांना लक्षात आले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच ताब्यात असलेली दुचाकी चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
कोठडीत असताना पोलिसांनी अधिक तपास केल्यावर आणखी २२ दुचाकी चोरल्याची कबुली चव्हाणने दिली. त्यातील १२ दुचाकी मालेगावातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी लपविल्याचे तसेच आणखी १० दुचाकी त्याचा एक साथीदार न्हानु जाधव (२४, जैताने, साक्री, धुळे) याला विक्री केल्याचेही त्याने सांगितले. या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. तसेच न्हानु यालाही अटक केली.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक तेगबिरसिंग संधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ आणि नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दीपक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.