नाशिक : श्रावणात मंगळागौरीला विशेष महत्व आहे. यंदाही मंगळागौरीच्या खेळांनी श्रावणाची रंगत वाढवली असून यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत आहे. श्रावणातील मंगळवारी नवविवाहितेसाठी मंगळागौरीच्या व्रताला विशेष महत्व आहे. सासरी रमलेल्या मुलीला माहेरी हक्काचा विरंगुळा मिळावा, यासाठी मंगळागौर महत्वाची ठरते. सखींचे हितगुज, गप्पांची मैफल या निमित्ताने रंगते. मंगळागौरीचे खेळ यामध्ये अधिकच रंगत वाढवतात. याआधी मंगळागौरीचे खेळ घरगुती स्तरावर खेळले जायचे. मात्र मागील काही वर्षांत मंगळागौरीच्या खेळाला व्यावसायिक स्वरुप प्राप्त झाले.

शहर परिसरात ५० हून अधिक मंगळागौरीचे खेळ खेळणारे गट आहेत. प्रत्येक गटात १० हून अधिक महिला आहेत. या निमित्ताने महिलांना आरोग्यासह सामाजिक प्रश्न, मानसिक ताण याविषयी प्रबोधन करण्यात येते. मंगळागौरीच्या खेळात लाट बाई लाट, अटुश बाई अटुश यासह विविध नवगीते समाविष्ट झाली आहेत.

मंगळागौरीच्या खेळानिमित्त व्यावसायिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत आहे. मंगळागौरीसाठी लागणाऱ्या नऊवार साड्या, त्यावरील पारंपरिक दागिने, याशिवाय त्या दिवशी चारचौघीत उठून दिसावे, यासाठी ब्युटीपार्लरमध्ये जाणे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक उलाढाल होत आहे.

या उत्सवासाठी खास नैवेद्य असतो. पाच सवाष्णींसह घरातील अन्य माणसे, सायंकाळी खेळासाठी येणाऱ्या महिला, बाहेरील मंडळी यांच्या सरबराईत घरातील बायका दमून जातात. या मुळे त्यांना या उत्सवाचा आनंद घेता येत नाही. यासाठी केटरिंग किंवा घरी येऊन स्वयंपाक बनवून देणाऱ्या लोकांना पसंती दिली जाते. महिलांना वाण देण्यासाठी बाजारपेठेत विविध वस्तु आहेत. हा संपूर्ण खटाटोप टाळण्यासाठी काही लोकांकडून कार्यक्रम व्यवस्थापनास (इव्हेंट मॅनेजमेंट) पसंती मिळत आहे.

एकाच छताखाली गुरुजी, पाच सवाष्णींसह सर्व व्यवस्था व्यवस्थापन कंपनीकडून करण्यात येत आहे. याविषयी हायर सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी श्रावणात वेगवेगळया पूजा, उत्सव अससल्याने मंगळागौरीसाठी स्वयंपाकाची भांडी, पूजा सामान यासह सर्व व्यवस्था आम्ही बघत आहोत, असे सांगितले. ग्राहकांच्या मागणीनुसार सर्वकाही ठरविले जाते. ग्राहकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या सर्वच सण, उत्सवांना व्यावसायिक स्वरुप आल्यासारखे झाले आहे. बाजारपेठेतही सण, उत्सव लक्षात घेऊन त्याप्रमाणे बदल होत आहेत. मंगळागौरीच्या खेळांना आता व्यावसायिक स्पर्श झाला असून खास मंगळागौरीसाठी म्हणून लागणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या, दागिने, पूजा साहित्य बाजारात उपलब्ध होत आहे. महिलांचाही अशा साहित्यांना प्रतिसाद मिळत आहे.