नंदुरबार – सध्या रमी प्रकरणामुळे राजकीय कारकिर्दीला लागलेले ग्रहण दूर होण्यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आता शनिचरणी लीन झाले आहेत. नंदुरबार दौऱ्यावर असलेले मंत्री कोकाटे यांनी साडेसातीमुक्तीचे शक्तीपीठ असे भाविकांमध्ये मानण्यात येणाऱ्या शनिमांडळ येथील शनिमंदिरात शनिवारी पूजा केली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने जनविश्वास सप्ताह अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ गावात शनिवारी कांतालक्ष्मी चॅरिटेबल हॉस्पिटल आणि राष्ट्रवादीच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबारचे पालकमंत्री असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी या शिबिरास भेट दिली. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील नियोजित कार्यक्रम रद्द करुन धुळ्याहून कोकाटे हे शुक्रवारीच नंदुरबार येथे आले. पालकमंत्री कोकाटे हे शुक्रवारी सायंकाळी उशिरा नंदुरबार येथे येणार होते. परंतु, ते दुपारी चार वाजताच नंदुरबारमध्ये दाखल झाल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्तेही चकित झाले.

रविवारी जिल्हा दौऱ्याला सुरुवात करण्याआधी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलणे टाळले. ते शनिंमांडळ येथील आरोग्य  शिबिरासाठी रवाना झाले.  शनिमांडळ येथे दाखल होताच त्यांनी या गावातील प्रसिध्द शनिमंदिरात जावून पूजा आणि आरती  केली. कृषिमंत्रीपद स्वीकारल्यापासून कोकाटे यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ट आणि त्यात रमी चित्रफित प्रकरणाची पडलेली भर यामुळे कोकाटे हे चांगलेच अस्वस्थ आहेत. त्यांच्या कृषिमंत्रीपदाचा मंगळवारी निर्णय घेण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर, कोकाटे यांनी शनिमंदिरात जावून शनिदेवालाच साकडे घातल्याचे मानले जात आहे.

 यावेळी आरोग्य शिबिराच्या व्यासपीठावरुन कोकाटे यांनी, राज्यातील सहकारी मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपणाकडे राज्यात दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज व्यक्त केल्याचे सांगितले. शनिमांडळच्या सरपंचांनी वळवाच्या पावसामुळे झालेल्या कांदा पिकाच्या नुकसांनीची भरपाई अद्याप मिळाली नसल्याचे निदर्शनास आणले. शनैश्वर महाराजांना दुष्काळ निवारण होवो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातील साडेसाती नष्ट होवो, आपल्याला चांगले दिवस प्राप्त होवो, अशी प्रार्थना केली. तसेच आमच्यासारख्यांच्या जीवनातील संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थना केल्याचे कोकाटे यांनी मान्य केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकीय क्षेत्रातील अनेक जण संकट आल्यावर देवाकडे धाव घेत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. या पंगतीत कोकाटे यांची भर पडली आहे.