जळगाव : महाराष्ट्र कार्य संचालनालयातर्फे शहरात मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, नवनियुक्त जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सध्या बंद असलेल्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाची पाहणी केली. नाट्यकर्मींना स्पर्धांसाठी नाट्यगृह उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

सुमारे ३० कोटींच्या निधीतून उभारण्यात आलेल्या शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह चालविण्याचे काम एका खासगी स्वयंसेवी संस्थेकडे काही वर्षांपासून देण्यात आले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे सदर संस्थेने आता काम सोडले आहे. त्यामुळे देखभाल-दुरूस्ती थांबल्याने नाट्यगृह सध्या ओस पडले आहे. या दरम्यान, नाट्यगृह चालविण्याची जबाबदारी देणारी कोणतीही निविदा प्रक्रिया राबविली न गेल्याने नोव्हेंबरमधील मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा कुठे आयोजित करावी, असा प्रश्न आयोजकांना पडला होता. अखेर शहरातील सर्व नाट्यकर्मींनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेऊन समस्या लक्षात आणून दिली. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः नाट्यगृहाला भेट देत नाट्यकर्मींच्या अडचणी जाणून घेतल्या.

एकेकाळी शहरात सांस्कृतिक, शैक्षणिक आणि इतरही बऱ्याच कार्यक्रमांसाठी उपयोगी पडू शकेल, अशा अद्ययावत सभागृहाची कमतरता होती. जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून विशेष बाब म्हणून सुमारे ३० कोटी रूपये मंजूर करून आणले. ज्यामुळे जळगावमध्ये छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह आकारास येऊ शकले. त्या ठिकाणी जुलै महिन्यात राज्यसभेचे नवनियुक्त खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे एक हजार नागरिक, जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त हे सर्व आवर्जून उपस्थित होते.

सभागृह खच्चून भरलेले असताना आतमध्ये मोठा आवाज करणाऱ्या तात्पुरत्या काही पंख्यांशिवाय हवा येण्याची कोणतीच सोय नव्हती. उपस्थित मंत्र्यांसह खासदार, आमदार आणि शेकडो नागरिकांवर घामाघूम होण्याची वेळ आली होती. त्यानंतर नाट्यगृहाच्या देखभाल व दुरूस्तीचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला होता.

प्रत्यक्षात, नाट्यगृहाच्या देखभालीसाठी एकही सक्षम स्वयंसेवी संस्था पुढे आली नाही. महापालिका प्रशासनाने सुद्धा स्वतःहून देखभालीची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली नाही. अशा स्थितीत १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या नाट्य स्पर्धेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून नाट्यगृहातील समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने नाट्यकर्मींशी चर्चा केली. नाट्यगृह एखाद्या संस्थेला चालविण्यास दिले तरी संबंधित संस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाट्यकर्मींचा समावेश असलेली एक समिती असावी, असे सूचविण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, कनिष्ठ अभियंता मुकेश सोनवणे, ज्येष्ठ नाट्यकर्मी चिंतामण पाटील, रमेश भोळे, शंभू पाटील, अनिल मोरे, डॉ. वैभव मावळे, गौरव लवंगले, विशाल जाधव, हर्षल पाटील, अमोल ठाकूर, आकाश बाविस्कर, नाट्यगृहाचे तांत्रिक सहाय्यक विजू पाटील आदी उपस्थित होते.