जळगाव : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्या हस्ते जामनेरमधील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि जिल्ह्यातील रस्त्यांचे ई-भूमिपूजन रविवारी दुपारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी भूमिपूजन होऊन प्रत्यक्षात काम सुरू झालेल्या रस्त्यांचे पुन्हा दुसऱ्यांदा भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते यावेळी केले जात आहे. ज्याची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील तोंडापूर आणि फत्तेपूर या गावांमध्ये राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्या हस्ते रविवारी आयोजित केले असताना, हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर असलेल्या जळगाव जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे भूमिपूजन देखील मंत्री भोसले यांच्या हस्ते करण्यात येत आहे. ज्यामध्ये जामनेरसह जळगाव, धरणगाव, यावल, अमळनेर, पारोळा, एरंडोल तालुक्यातील बऱ्याच रस्त्यांचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यापूर्वी भूमिपूजन होऊन प्रत्यक्षात काम सुरू झालेल्या रस्त्यांचेही सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते यावेळी पुन्हा ई-भूमिपूजन केले जात आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत मंजूर झालेल्या जळगाव ते किनगाव दरम्यानच्या रस्त्याचेही गेल्या एप्रिल महिन्यात भूमिपूजन झाले होते. सुमारे १०० कोटी रूपयांच्या निधीतून होत असलेल्या २४ किलोमीटरच्या त्या रस्त्याचे काम आता सुरू देखील झाले आहे. मात्र, सदरच्या रस्त्याचे श्रेय घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून आता पुन्हा जळगाव-किनगाव रस्त्याचे ई-भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्या हातून केले जात आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा त्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

दुसऱ्यांदा भूमिपूजनाचा उद्देश काय ?

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री पाटील यांच्यात शासनाच्या निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे श्रेय घेण्यावरून चढाओढ सुरू झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, आपल्या स्वतःच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील तसेच शिंदे गटाचे आमदार असलेल्या तालुक्यांमधील रस्त्यांच्या भूमिपूजनासह लोकार्पणाचा पालकमंत्री पाटील यांनी अलिकडच्या काळात सपाटा लावला आहे. तोच कित्ता मंत्री गिरीश महाजन यांनीही आता गिरवला असला, तरी पालकमंत्री पाटील यांनी यापूर्वी भूमिपूजन केलेल्या रस्त्यांचे मंत्री भोसले यांच्या हस्ते दुसऱ्यांदा ई-भूमिपूजन करण्याची खेळी महाजन यांनी केली आहे. त्यातून पालकमंत्री पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न मंत्री महाजन करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.