जळगाव : जिल्ह्याच्या दौऱ्यावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी कर्जमाफीवरून राष्ट्रवादीने (शरद पवार) शुक्रवारी काळे झेंडे दाखवले. मात्र, त्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. प्रत्यक्षात त्याठिकाणी त्यांना सपशेल बेदखल करण्यात आले. व्यासपीठाऐवजी त्यांना समोर बसावे लागले.

धरणगाव येथे क्रांतिकारक ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाचे लोकार्पण तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन आणि गोद्री (ता. जामनेर) येथील हिंदू गोरबंजारा- लभाना समाजाच्या कुंभ प्रेरणास्थळ स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. या कार्यक्रमास महायुतीचे जिल्ह्यातील सर्व मंत्री व आमदार उपस्थित होते. शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांची त्याठिकाणची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. महायुतीच्या मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. खडसे मात्र व्यासपीठाच्या समोरच्या खुर्चीवर बसले होते. मुख्यमंत्री फडणवीस बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर त्यांनी खडसे यांच्याकडे साधा कटाक्षही टाकला नाही. त्यांचे नाव घेणे तर दूरच राहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जळगाव विमानतळावर आगमन होताच कार्यक्रमास एकनाथ खडसे येणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर त्याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगून फडणवीस यांनी त्या विषयावर जास्त बोलणे टाळले होते. प्रत्यक्षात खडसे कार्यक्रमास उपस्थित राहिल्यावर फडणवीस यांनी त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्याविषयी विचारल्यावर हा कार्यक्रम शासनाचा नव्हे तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा होता, असे खडसे यांनी नमूद केले. व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केवळ मंत्री, आमदार आणि खासदारांसाठीच होती. जिल्ह्यातील इतर आमदारांसाठी व्हीआयपी कक्षात बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम शासकीय असता, तर सर्वांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले असते, असे खडसे यांनी सांगितले.