नाशिक : कांद्याचे घसरते दर, पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान, हमी भाव, पीक विमा अशा राज्यातील शेतकऱ्यांशी संंबंधित विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे १५ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करीत असताना महायुती सरकार कुरघोडी, भांडण्यात व कोट्यवधींच्या जाहिरात बाजीत व्यस्त असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे १४ सप्टेंबर रोजी कार्यकर्ता मेळावा तर, दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ तारखेला मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या आ. पवार यांनी बैठक घेऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोर्चा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहिरात फलक, खड्डेमय रस्ते, कुंभमेळा कंत्राट, मराठा आरक्षणासंबंधी शासकीय अध्यादेश आदी विषयांवर भाष्य केले. जाहिराती व फलकांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले नसेल. परंतु, त्यांना खूश करण्यासाठी काही लोकांनी जाहिरात दिली.

गणेशोत्सवात प्रसिध्द झालेल्या जाहिरातीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र कशासाठी याचे निश्चित कारण माहिती नाही. परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत जो निर्णय झाला, त्याचे श्रेय इतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांना मिळू द्यायचे नाही, असा हेतू होता का, असा प्रश्न आ. पवार यांनी केला. मित्रपक्षातील सत्ताधारी मंत्र्याने वृत्तपत्रात जाहिरातीसाठी १५ कोटी आणि विमानतळावरील जाहिरात फलकांसाठी सात कोटी रुपये खर्च केले. तो मंत्री भाजपचा नाही. हा खर्च का केला गेला, तो मंत्री कोण हे लवकरच उघड करेल. असे त्यांनी सूचित केले.

भाजप सोडून इतर नेत्यांवर आरोप झाले तर ती व्यक्ती मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटते. तेव्हा ते घाबरू नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे असे सांगत असावेत. मंत्री संजय शिरसाठ यांच्याबद्दल आपण पुरावे देऊनही कारवाई झाली नसल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले. एकतर सरकारकडे पैसे नाही आणि दुसरीकडे मोठ्या प्रकल्पांकडे पैसे वळवले जात आहे. शक्तीमार्ग नको असताना रेटला जात आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी सहा मार्गिकेच्या रस्त्यासाठी जो खर्च सांगतात, त्याच्या दुप्पट खर्च फडणवीस सरकार करीत आहे. मोठ्या ठेकेदारांना कंत्राटे देऊन मलिदा लाटला जातो, असा आरोप आ. पवार यांनी केला. कुंभमेळ्याच्या कामात वेगळे काही घडले नाही. १० हजार कोटींची कामे एकत्रित केली गेली. कुंभमेळ्याच्या पवित्र काळात अपवित्र कामे केली जातात. तेलंगणा व गुजरातमधील लोकांना ही कामे दिली जातात. छोट्या व मराठी ठेकेदाराला कामे मिळत नाही. जलजीवनची कामे कुणाला दिली ते बघा, असेही. आ. रोहित पवार यांनी सूचित केले.