नाशिक – हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिकेमुळे महायुती सरकारला निर्णय मागे घ्यावा लागल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. सोमवारपासून इगतपुरी येथे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिबीर होत आहे. महापालिका निवडणुकीत कुणाशी हातमिळवणी करायची, यावर मुख्यत्वे शिबिरात मंथनाची चिन्हे आहेत. काही वर्षांपूर्वी पक्षाचे अलिबाग आणि नंतर पनवेल येथे शिबीर झाले होते. जवळपास पाच वर्षानंतर पुन्हा असे शिबीर होत असल्याचे काही जुने पदाधिकारी सांगतात.

इगतपुरीतील कॅमल व्हॅली रिसॉर्ट येथे सोमवारपासून तीन दिवस शिबीर होणार आहे. त्यामध्ये पक्षाचे प्रमुख नेते, राज्यस्तरीय पदाधिकारी, उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, शहराध्यक्ष असे १०० हून अधिक जण उपस्थित राहतील. याबाबतची माहिती प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी दिली. शिबिराच्या पूर्वसंध्येला तयारीचा आढावा स्थानिक नेत्यांकडून घेण्यात आला. मनसेने शिबिरासाठी निवडलेले स्थळ प्रेक्षणीय आहे.

घाटमाथ्यावरील इगतपुरी परिसर मुसळधार पावसासाठी ओळखला जातो. या काळात सर्वत्र दाट धुके दाटलेले असतात. प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांचे महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने मंथन आणि वर्षा सहल एकाचवेळी होणार आहे. या शिबिरात महिला आघाडीचा सहभाग असेल की नाही, याची स्पष्टता झालेली नाही. रविवारी सायंकाळपर्यंत सहभागी होण्याबाबत त्यांना पक्षाकडून कुठलेही निरोप आलेले नव्हते, असे नाशिकमधील काही महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अलिबाग, पनवेल आणि आता नाशिक

याआधी साधारणत: सहा, सात वर्षांपूर्वी अलिबाग येथे राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबीर झाले होते. त्या शिबिरात महिला आघाडीच्या पदाधिकारी, माजी नगरसेवकही सहभागी झाले होते. नंतर लगेचच पनवेल येथे शिबीर झाले. मधल्या काळात प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिबीर, बैठक झाली असल्यास त्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांना नाही. जवळपास पाच वर्षानंतर राज्यातील पदाधिकाऱ्यांचे इगतपुरीत शिबीर होत असल्याचे काहींनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिका निवडणुकीत एकत्र राहतील का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) मनसेशी जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. परंतु, त्यावर मनसेने आपली भूमिका जाहीर केलेली नाही. उलट, या संदर्भात मनसेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने परस्पर भाष्य नये, अशी सूचना दिली गेली होती. शिबिरात महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर प्रामुख्याने चर्चा होईल. शहराध्यक्षांसह अन्य नेत्यांची मते जाणून घेतली जातील आणि अखेरीस काही निर्णय होईल, अशी काही पदाधिकाऱ्यांना अपेक्षा आहे.