जळगाव : प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधा, प्रस्तावित आणि प्रगतीपथावरील प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी भुसावळसह नागपूर विभागातील खासदारांची उच्चस्तरीय आढावा बैठक मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांबरोबर पार पडली. त्यात सहभागी खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील प्रश्न मांडले. प्रवाशांच्या सोयीसाठी काही सुधारणा सुचविल्या. या बैठकीला जळगावसह नंदुरबार जिल्ह्याचे खासदार अनुपस्थित होते.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांनी उच्चस्तरीय आढावा बैठक नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील समाधान सभागृहात घेतली. त्याठिकाणी धुळ्याच्या डॉ.शोभा बच्छाव, नाशिकचे राजाभाऊ वाजे, दिंडोरीचे भास्कर भागरे, अमरावतीचे बळवंत वानखेडे, रामटेकचे श्यामकुमार बारवे, यवतमाळ-वाशीमचे संजय देशमुख, वर्ध्याचे अमर काळे, अकोल्याचे अनुप धोत्रे, छिंदवाडाचे बंटी साहू, होशंगाबादचे दर्शनसिंह चौधरी आदी खासदार उपस्थित होते.
बैठकीत खासदार धोत्रे यांची समितीचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मीणा यांनी विविध प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीत खासदारांनी दिलेल्या सहकार्याची माहिती दिली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रेल्वे प्रशासन प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मध्य रेल्वेच्या यशस्वी कामगिरीवर देखील प्रकाशझोत टाकला. मध्य रेल्वेला प्रतिष्ठित जी.बी.पंत ढाल तसेच पहिले व दुसरे नवोपक्रम पुरस्कार प्राप्त झाल्याचा उल्लेख केला.
नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग आणि भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांनी त्यांच्या विभागातील उपलब्धतेबाबत सविस्तर सादरीकरण केले. प्रसंगी खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. दरम्यान, बैठकीला उपस्थित खासदारांनी अमृत भारत स्थानक योजना, वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेस तसेच वंदे मेट्रोच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. सूत्रसंचालन मध्य रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक के. के. मिश्रा यांनी केले.