जळगाव – जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार सातत्याने उघडकीस येत असले, तरी निर्ढावलेली शासकीय यंत्रणा कोणालाच जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. तशात आता मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून नागरिकांकडून कामाच्या मोबदल्यात सर्रास पैसे घेत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मुक्ताईनगर तालुक्यास विशेष ओळख प्राप्त झाली आहे. असे असताना, त्या ठिकाणच्या तहसील कार्यालयात एरवी नेहमीच गरजू नागरिकांची कागदपत्रांवरील स्वाक्षरीसह शिक्क्यासाठी अडवणूक केली जाते.

श्रावणबाळ, संजय गांधी योजनेसह विद्यार्थ्यांना शाळेसाठी लागणारे कागदपत्रे व इतर शासकीय कामांच्या शपथपत्रांसाठी नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याची तक्रार वारंवार करण्यात येते. मात्र, अधिकारी त्या प्रकाराकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना गैरमार्गाने पैसे कमविण्याचे प्रोत्साहनच मिळते. अशाच एका अव्वल कारकुनाने महिलेकडून पाच-सहा दिवसांपूर्वी शपथपत्रावरील स्वाक्षरी व शिक्क्यासाठी रोख रक्कम स्वीकारल्याची चित्रफित सध्या समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे.

दरम्यान, संबंधित अव्वल कारकून बिनबोभाटपणे नागरिकांकडून कामाच्या मोबदल्यात पैसे घेत असल्याची चित्रफित सगळीकडे प्रसारित झाल्यानंतर महसूल विभागातील लाचखोरी चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. सदरची चित्रफित मुक्ताईनगर तहसीलदार कार्यालयातीलच असून, ती पाहिल्यानंतर संबंधित अव्वल कारकुनाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याबाबतचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाईसाठी आता प्रांताधिकाऱ्यांना अहवाल पाठविला आहे, अशी माहिती तहसीदार गिरीश वखारे यांनी लोकसत्ताला दिली.

नागरिकांकडून पैसे घेणारे अव्वल कारकून कैलास पाटील यांना चित्रफित पाहिल्यानंतर कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पुढील कारवाई संदर्भात अहवाल आता प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. – गिरीश वखारे (तहसीलदार, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव).