जळगाव – कायद्याचा कोणालाच धाक न राहिल्याने निवडणुकांचा हंगाम जवळ येताच शहरात सगळीकडे बॅनरबाजीला ऊत आला आहे. महापालिकेच्या हद्दीत महामार्गासह मुख्य रस्त्यांवर जागोजागी अनधिकृत डिजिटल बॅनर झळकताना दिसून येत आहेत. त्यापैकीच एक असलेले आकाशवाणी चौकातील आमदाराच्या वाढदिवसाचे भव्य दिव्य बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने उड्डाणपुलाऐवजी सर्कल तयार केल्यापासून आकाशवाणी चौकच जरा जास्तच लक्षवेधी ठरला आहे. या ठिकाणी अपघात घडला नाही, असा एकही दिवस जात नाही. त्यात राजकीय पक्षांना हा चौक आंदोलन करण्यासाठी खूपच सोयीचा वाटतो. जिल्हाधिकारी कार्यालय हाकेच्या अंतरावर असल्याचाही फायदा आंदोलकांना होतो. आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यासोबतच रास्ता रोकोचा दुहेरी उद्देश सहजपणे साध्य होत असतो. त्यामुळे महिन्यातून एकदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा या चौकात वरचे वर आंदोलने सुरूच असल्याचे दिसून येते.
दरम्यान, सकाळपासून सायंकाळपर्यंत वाहतुकीची सतत कोंडी होत असलेल्या या चौकात उभारलेले सर्कल राजकीय पक्षांसाठी विशेष उपयोगी ठरले आहे. शहरात कोणीही मोठा नेता आल्यास सर्वात आधी आकाशवाणी चौकात भव्य दिव्य बॅनर लावले जातात. ज्यामुळे नेत्यांसमोर बॅनर लावणाऱ्यांच्या निष्ठेचे प्रदर्शन होते.
मात्र, आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ शकतो या विचार कोणीच करत नाही. आकाशवाणी चौकात उठसूठ लावले जात असलेले बॅनर दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांसाठी नेहमीच त्रासदायक ठरतात. एकतर त्याठिकाणी लावलेले बॅनर एकदा झळकले म्हणजे किमान आठवडाभर तरी तिथेच राहतात. महापालिका प्रशासन तिकडे ढुंकुनही पाहत नाही. किंवा अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्यासाठी पाऊल उचलत नाही. कारण, त्यांच्या लेखी आकाशवाणी चौक राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अख्त्यारित आहे. याचा प्रत्यय तीन दिवसांपूर्वी एका लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसानिमित्त उभारलेल्या सुमारे ४० फूट उंच आणि २० फूट रूंद बॅनरवरून पुन्हा एकदा आला आहे.
दरम्यान, आकाशवाणी चौकात अनधिकृत बॅनर उभे केल्याचे लक्षात येताच ते तातडीने काढून टाकण्याविषयी महापालिकेच्या प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाला नोटीस बजावली होती. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत शुभेच्छा फलक कोसळून केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर ठिकाणी कोणतीही जीवित अथवा आर्थिक हानी झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल, असेही महापालिकेने नोटीसीत म्हटले आहे. प्रत्यक्षात, महापालिकेने नोटीस बजावल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने कारवाईसाठी काहीच हालचाल सोमवारी दुपारपर्यंत केल्याचे दिसून आले नाही. त्याबद्दल नागरिकांनीही सखेद आश्चर्य व्यक्त केले.
महापालिकेने अनधिकृत बॅनर काढून घेण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यानुसार, आम्ही कार्यवाही देखील करणार आहोत. मात्र, महापालिका प्रशासनाने आम्हाला बजावली तशी नोटीस बॅनर बाजी करणाऱ्यांना बजावलेली नाही. – रावसाहेब साळुंखे (प्रकल्प संचालक, महामार्ग विकास प्राधिकरण).