नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि आमदार सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकासआघाडीने शुभांगी पाटील यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केलं. मात्र, मविआच्या उमेदवार असूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शुभांगी पाटील यांचा प्रचार केला नाही आणि अनेक ठिकाणी त्यांचे बुथही नव्हते, असा आरोप होतो आहे. यावर स्वतः शुभांगी पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतली.

शुभांगी पाटील म्हणाल्या, “मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यासाठी प्रचार केला नाही याविषयी मला तरी माहिती नाही. जळगाव, धुळे, नंदूरबार, अहमदनगर किंवा नाशिकमध्ये प्रत्येक ठिकाणी मी पोहचण्याआधी महाविकासआघाडीचे नेतेमंडळी हजर होते. मला रस्त्यावर घेण्यासाठीही तेच होते. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी काम केलं नाही, असा कोणताही विषय नाही.”

“बलाढ्यशक्तींनी सांगितलं तरी विजय माझा आहे”

“मला जेवायला वेळ मिळत नव्हता, तर लोक मला खायला घेऊन येत होते. माझ्याजवळ रडत होते. शुभांगी पाटीलवर जितकं प्रेम केलं, तितकं प्रेम जनतेने कोणावरच केलं नसेल. मी भाग्यवान आहे. त्यामुळे कोणी काहीही सांगो, बलाढ्यशक्तींनी सांगितलं तरी विजय माझा आहे,” असं मत शुभांगी पाटील यांनी व्यक्त केलं.

“मी वरिष्ठांकडे तक्रार करणार नाही”

काँग्रेसचे कार्यकर्ते उघडपणे भाजपाचा प्रचार करताना दिसले. त्यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करणार का? असा प्रश्न विचारला असता शुभांगी पाटील म्हणाल्या, “मी वरिष्ठांकडे तक्रार करणार नाही. तो माझा विषय नाही. माझा विषय फक्त काम करणं आहे.”

हेही वाचा : Photos : तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? सत्यजीत तांबे म्हणाले, “एका उदात्त हेतूने…”

“संगमनेरमध्ये चौथ्याच्या मुलाने मतदान केलं की…”

शुभांगी पाटील संगमनेरमधील बोगस मतदानाच्या आरोपावरही बोलल्या. त्या म्हणाल्या, “मला किती मतदान झालं हे मला पाठ आहे. कारण मी गेल्या १० वर्षांपासून याच जनतेत फिरत आहे. त्यामुळे मला किती मतदान होईल याचा मतदारही माझा पाठ होता. कोणी काहीही सांगितलं तरी ते मतदान मला झालं आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये चौथ्याच्या मुलाने मतदान केलं की, कोणी केलं हे मला माहिती नाही. पदवीधर मतदार माझा पाठ आहे. म्हणून विजय माझाच होणार आहे.”

“अनेक ठिकाणी माझे बुथही लागले नव्हते हे मला माध्यमांमधूनच कळालं”

“अनेक ठिकाणी माझे बुथही लागले नव्हते हे मला माध्यमांमधूनच कळालं. माझा बुथ प्रत्येक ठिकाणी होता. काही ठिकाणी दोन लोकं असतील, मात्र प्रत्येक ठिकाणी बुथ लागला होता. मी मोठ्या फरकाने विजय होईल. मी नावानिशी कुठं किती मतदान झालं हे सांगू शकेन” असं मत शुभांगी पाटील यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : Photos : “मला भाजपाची ऑफर…”, पदवीधर निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबेंचं वक्तव्य

“मी बुथनुसार कुठे किती मतदान झालं हे सांगू शकते”

“चाळीसगावमध्ये किती झालं, खांदेशात किती झालं, नगरमध्ये किती झालं, नाशिकमध्ये किती मतदान झालं हे मी बुथनुसार सांगू शकते. काहीही सांगितलं तरी मतदार माझा होता. एवढं प्रेम जनतेने कोणावरच केलं नसेन, जेवढं माझ्यावर केलं,” असंही शुभांगी पाटलांनी नमूद केलं.

“पैशाने बलाढ्य असून उपयोग नाही”

तुमच्यासमोर सत्यजीत तांबेंसारखे बलाढ्य उमेदवार होते असा मुद्दा उपस्थित झाल्यावर शुभांगी पाटील म्हणाल्या, “पैशाने बलाढ्य असून उपयोग नाही. कामाने बलाढ्य असायला हवं आणि कामाने बलाढ्य मीच आहे.”

निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आंदोलन का करणार?

विशेष म्हणजे शुभांगी पाटील निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आंदोलन करणार आहेत. याविषयी विचारलं असता त्या म्हणाल्या, “अनेक प्रश्न मोठ्या काळापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे एक एक दिवस वाया जाणं मला योग्य वाटत नाही. पदवीधर अनेक प्रश्नांनी ग्रासलेला आहे. ते प्रश्न सोडवण्यासाठी एक एक दिवस महत्त्वाचा आहे.”

हेही वाचा : Maharashtra MLC Election Results Live: “..म्हणून मी जिंकणार”,शुभांगी पाटील यांनी सांगितलं मतांचं गणित; सत्यजीत तांबेंच्या पराभवाचा दावा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निकाल लागण्याआधीच आंदोलनाचा इशारा का?

“मी आज आंदोलन करत नाहीये. मी गेल्या चार वर्षांपासून पदवीधरांच्या प्रश्नावर काम करत आहे. तेव्हापासून मी सांगितलं होतं की, जेव्हा मी विजयी होईल तेव्हा मी विजयाची रॅली काढणार नाही, तर आंदोलनाची रॅली काढेन. हे मी आधीपासून सांगत होते, कारण प्रश्न फारच जटील आहेत. जनतेने त्यासाठीच निवडून दिलेलं असतं. निकाल लागला की, मी लगेच आझाद मैदानावर आंदोलनासाठी जाणार आहे,” असं शुभांगी पाटील यांनी नमूद केलं.