नंदुरबार : प्रत्येक पावसाळ्यात वारंवार त्याच त्या समस्यांना सामोरे जावे लागणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांच्या मरणयातना मृत्युनंतरही कायम राहात असल्याचा अनुभव पुन्हा एकदा आला. नंदुरबार तालुक्यातील शेगवे गावात पूल नसल्याने नदीतील पाण्यातून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह घेऊन जाण्याची कसरत नातेवाईकांना करावी लागली.

नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या केलखाडी गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एका पडलेल्या झाडावरुन नदी ओलांडावी लागत असल्याचे उदाहरण ताजे असताना आता जिल्ह्यातील सपाटी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवापूर तालुक्यातील एक विदारक चित्र समोर आले आहे. शेगवे या गावात पावसाळ्यात कोणाचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांसमोर संकट उभे राहते. त्यांना वेगळीच चिंता सतावते.

शेगवे गावातील स्मशानभूमी नेसू नदीच्या पलीकडे आहे. नदीवर पूल नाही. पावसाळ्यात नेसू नदी दुथडी भरुन वाहत असते. त्यामुळे नदी ओलांडणे कठीण होते. त्यामुळे गावातील कोणाचा मृत्यू झाल्यास मृतदेह स्मशानभूमीपर्यंत कसे न्यायचे, हा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहतो. गावातील इमाबाई वसावे यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. सततच्या पावसामुळे दुथडी भरुन वाहणाऱ्या नेसू नदीतून इमाबाई यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून मृतदेह स्मशानभूमीकडे नेला. त्यानंतर अंतिम संस्कार करण्यात आले.

नेसू नदीच्या जोरदार प्रवाहात एकमेकांचा हात हातात घेत कसरत करुन मृतदेह स्मशानभूमीपर्यंत न्यावा लागला. मृतदेह नदीतून नेतांना खांदेकरी असलेल्या नातेवाईकांच्या गळ्यापर्यंत पाणी आले होते. अंत्यविधीचे सर्व साहित्य दुसऱ्या गावाहून दूरचा फेरा मारुन स्मशानभूमीत न्यावे लागले. या त्रासामुळे ग्रामस्थ वैतागले असून प्रशासन आणि राजकारण्यांविरुध्द संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मी याठिकाणी अंत्यविधीसाठी आलो होतो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊनही जर गावकऱ्यांना पुलासारखी सुविधा देता येत नसेल तर कसे होणार ? मागील वर्षी याच ठिकाणी नदी ओलांडतांना एका ग्रामस्थास वाहून जाताना वाचविण्यात आले होते. अशा घटनांकडे दुर्लक्ष होत असेल तर मग ग्रामस्थांनी काय करावे ? – अविनाश गावीत (सरपंच, खांडबारा, नंदुरबार)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या अनेक वर्षांपासून नेसू नदीवर पुलासाठी आम्ही मागणी करत आहोत. या पुलापलीकडे अनेकांची शेती आहे .तसेच मुख्य म्हणजे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नदीतूनच रस्ता आहे. आमच्या मागणीकडे प्रशासन आणि शासनाकडून लक्ष दिले जात नाही. – निखील गावीत (उपसरपंच, शेगवे, नंदुरबार)