नाशिक : रामकुंडावरील वस्त्रांतरगृह पाडण्याचे काम महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने सुरू आहे. शुक्रवारी पाडकाम सुरु असताना जवळील दत्त मंदिराचा काही भाग तुटल्याने पुरोहित संघाने काम बंद पाडले. शहर अभियंतांनी घटनास्थळी धाव घेत पुरोहितांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रामकुंड येथे धाव घेत पूर्वीपेक्षा अधिक सुंदर मंदिर बांधून देण्याचे आश्वासन देत कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असा विनम्रपणा दाखविल्याने वादावर पडदा पाडला.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर ते गोदाघाट दरम्यान रामकाल पथ तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पात अडथळा ठरणारे वस्त्रांतरगृह तसेच वाहनतळ परिसरातील निवारा शेड पाडण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. वस्त्रांतरगृह निम्मे जमीनदोस्त करण्यात आले आहे. याठिकाणी असलेल्या प्राचीन मंदिरांची सुरक्षितता असावी म्हणून वस्त्रांतरगृह पाडताना मंदिरांना वाळूच्या गोण्यांनी झाकण्यात आले आहे. गुरुवारी मध्यरात्री पाडकाम सुरु असताना वस्त्रांतरगृहाचा काही भाग जवळील दत्त मंदिरावर कोसळला. त्यामुळे मंदिराच्या कळसाच्या भागाचे नुकसान झाले. शुक्रवारी हा प्रकार सकाळी पुरोहित रामकुंडावर विधी करण्यासाठी आले असता त्यांच्या लक्षात आला. त्यांनी पाडकाम बंद करत कारवाईला विरोध केला. महापालिका विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
या घटनेची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांना मिळताच त्यांनी रामकुंड येथे धाव घेतली. पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांना मंदिराची पुनर्बांधणी करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सतीश शुक्ल हे काम बंद करण्यावर ठाम राहिल्याने पाडकाम बंद करण्यात आले. या घटनेची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना मिळाल्यानंतर त्यांनी दुपारी रामकुंड येथील नुकसान झालेल्या मंदिराची पाहणी केली.
पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच, उर्वरित बांधकाम पाडताना काळजी घेण्यात येईल. नुकसान झालेले मंदिर लवकरच पुन्हा बांधण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला. या पाहणी दौऱ्यावेळी विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनीषा खत्री, आमदार राहुल ढिकले, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.