नाशिक : जिल्ह्यात बिबट्याची दहशत वाढत असताना शुक्रवारी सकाळी लोहशिंगवे भागात बिबट्याच्या हल्ल्यात ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. नाशिक, सिन्नर, इगतपुरी, निफाडसह दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावात बिबट्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागत असताना वन विभागाकडून पुरेशा उपाययोजना केल्या जात नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

देवळालीच्या तोफखाना स्कूलचा सभोवताली हजारो एकर फायरिंग रेंजचा परिसर आहे. लष्करी हद्दीलगतच्या वडनेर, लोहशिंगवे नांदूरवैद्य, वंजारवाडी, लहवीत, पिंपळगाव खांब, दाढेगाव आदी भागात बिबट्यांचा मुक्त संचार असतो. बिबट्याच्या हल्ल्यांच्या आजवर अनेक घटना घडल्या आहेत. यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. शुक्र‌वारी नव्या घटनेने परिसर हादरून गेला. लोहशिंगवे येथे पहाटे पाच वाजेच्या सुमारास सुदाम म्हाळू जुंद्रे या ३० वर्षीय तरूणावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी आरडाओरड करीत धाव घेतली. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे सुमित निर्मळ आणि प्रशांत खैरनार या अधिकाऱ्यांनी पथकासह धाव घेतली. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचा सखोल तपास करणे अद्याप बाकी असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे. बिबट्या-मानवी संघर्ष गंभीर वळणावर आला आहे. बिबट्यामुळे अनेक गावात दहशतीचे वातावरण आहे. अंधार पडल्यानंतर नागरिकांना स्वताला बंदीस्त करून घेण्याची वेळ येते. रात्रीच्यावेळी शेतीला पाणी द्यायला जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. काही वर्षांपूर्वी रात्रीच्यावेळी बिबट्यांचे हल्ले होत असत. आता मात्र काही घटनांध्ये दिवसादेखील त्यांनी हल्ला केल्याचे दिसून येते. यामुळे बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

वन्यप्राणी बिबट्या नागरी वसाहतीलगत ऊस व मक्याच्या शेतांत अधिवास तयार करीत असल्याचे वन विभागाचे निरीक्षण आहे. बिबट्याची जीवनसाखळी पुढे जाण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाल्यामुळे भविष्यात बिबट्यांची संख्या वाढतच जाण्याचा अनुमान काढला गेला आहे. मध्यंतरी वन विभागाने बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्याचा विचार केला होता. बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी नर बिबट्यांच्या निर्बिजीकरणाचा पर्याय आहे. असा प्रस्ताव तयार करण्याची तयारी वन विभागाने केल्याचे सांगितले जाते.