नाशिक – राज्यातील ७२ उच्च आजी-माजी अधिकारी, राजकीय नेते आणि काही मंत्री यांना ज्या हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे, त्यातील ‘मान्यवरांचे‘ नाव ऐकण्यास नाशिककर उत्सुक असल्याचे फलक शहरात झळकले आहेत. विशेष म्हणजे या फलकावर हनी ट्रॅप प्रकरणाचा उपरोधित स्वरुपात उल्लेख झाल्यामुळे हा ‘ट्रॅप’ होता की नाही याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्यभरात गाजणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरण नित्यनवीन वळण घेत आहे. विधिमंडळात हे प्रकरण गाजले होते. राज्यातील ७२ उच्च आजी-माजी अधिकारी, राजकीय नेते आणि काही मंत्री यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले गेले. या प्रकरणात ठाण्यासह नाशिक शहराचा उल्लेख झाल्याने नाशिकमध्ये यावर चांगलीच चर्चा रंगली.

काँग्रेस नेता, हॉटेल ‘कुठे’ ?

राजकीय आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये असा प्रकार खरोखर झाला असेल काय, इथपासून तर विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या आरोपात उल्लेख करण्यात येणारे हाॅटेल कोणते, ते ’कुठे‘ आहे याविषयी अंदाज बांधले गेले. अखेरीस हे हॉटेल काँग्रेसच्या माजी नेत्याशी संबंधित असल्याचा उल्लेख झाल्यानंतर तो नेता कोण, त्याचे हॉटेल मुंबई नाका ते चांडक चौक भागात ‘कुठे’ याची छाननी अनेकांकडून झाली.

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ?

महसूल विभागातील बड्या अधिकारी व नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून कोट्यवधींच्या खंडणीची मागणी केली गेली. या संदर्भात महिलेने आणि नंतर महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दिल्या. मात्र नंतर या परस्परविरोधी तक्रारी मागे घेतल्या गेल्याचे बोलले जाते. ७२ उच्च आजी-माजी अधिकारी, राजकीय नेते आणि काही मंत्र्यांना अडकविण्याचा प्रयत्न होऊनही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याची असल्याची भावना आहे. त्याची परिणती अखेरीस फलकबाजीत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हनी ट्रॅप फलक कोणी लावले ?

अतिशय वर्दळीच्या नाशिकच्या मध्यवर्ती भागातील महात्मा गांधी रस्त्यावर हनी ट्रॅप प्रकरणाशी संबंधित फलक झळकले. ‘हनी (ट्रॅप) एन्जॉय प्रकरणातील मान्यवरांचे नावे ऐकण्यास नाशिककर उत्सुक आहेत‘ असा उपरोधिक उल्लेख फलकावर करण्यात आला आहे. मनोज, अमित आणि समस्त नाशिककर यांच्याकडून हा फलक लावला गेल्याचे दर्शविले गेले आहे. यशवंत व्यायामशाळेच्या जाळीवर लावलेल्या या फलकाने या प्रकरणातील ७२ अधिकारी, राजकीय नेते कोण याची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.