नाशिक – अवघ्या तीन ते चार महिन्यांपूर्वी विमान कंपन्यांनी आपले भाडे २५ ते ३० टक्क्यांनी कमी केले होते. सततच्या पावसामुळे प्रवाशांनी बाहेर जाणे टाळल्याचाही विमान प्रवासावर परिणाम झाल्याचे मानले गेले. त्यामुळे जुलै महिन्यात नाशिकच्या ओझर विमानतळावरून अहमदाबाद, हैदराबाद, इंदूर, गोवा यांसारख्या ठिकाणी जाण्यासाठी विमान तिकीट ३५०० रुपयांपेक्षा कमी दरात उपलब्ध होते. परंतु, अवघ्या चार महिन्यात हे चित्र बदलले आहे. दिवाळीच्या सुट्याच्या पार्श्वभूमीवर, पर्यटक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागल्याचा विमान कंपन्यांनी फायदा उचलला आहे. त्यांनी तिकीट दरात जुलैच्या तुलनेत तिप्पट वाढ केल्याचे दिसत आहे.

दिवाळी असो किंवा उन्हाळा असो. या कालावधीत विद्यार्थ्यांना सुट्ट्या राहत असल्याने पर्यटनावर कुटूंब अधिक भर देतात. त्यामुळे या कालावधीत रेल्वेसह विमान प्रवासालाही पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. परंतु, सुट्या संपल्यानंतर विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होते. विमान कंपन्यांसाठी हा मंदीचा कालावधी समजला जातो. जुलैमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने आणि शाळा सुरु झाल्याने पर्यटकांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे विमान प्रवासासाठी प्रवाशांची संख्या घटली होती. अशा कालावधीत अनेक विमान कंपन्या आपले तिकीट दर कमी करतात.काही कंपन्या तर तिकीट विक्री वाढविण्यासाठी सवलतीही जाहीर करतात. जुलै महिन्यात नाशिकच्या ओझर विमानतळावरुन नवी दिल्लीसाठी जाणाऱ्या विमानाचे तिकीट दर रु. ५, ९०६,, अहमदाबादसाठी रु.४, ०५५, इंदूरसाठी रु. ३,१६३, हैदराबादसाठी रु.४,९२५, गोव्यासाठी रु. ३, ९५९ असे होते.

पावसाळा संपला. दिवाळीच्या सुट्या ऑक्टोबरमध्ये सुरु झाल्या. त्यानंतर सर्व चित्र पालटले. सुट्ट्यांमुळे नाशिककर पर्यटनासाठी बाहेर पडू लागले. नाशिकच्या ओझर विमानतळावरुन हैदराबाद, दिल्ली, इंदूर, बंगळुरु, गोव्यासाठी विमानसेवा असल्याने विमानाने जाण्यासाठी पर्यटक प्राधान्य देऊ लागले आहेत. पर्यटकांचा वाढता प्रतिसाद पाहून विमान कंपन्यांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. २६ ऑक्टोबरपर्यंत विमान तिकीटांची दरवाढ राहणार असल्याचे सांगितले जाते. या दरवाढीनुसार नाशिकहून दिल्लीसाठी रु. १८, १८०, इंदूरसाठी १८०९९, गोव्यासाठी १५, ३३५, बंगळुरुसाठी १४, १३४, हैदराबादसाठी रुपये १२, ४८५ असे दर झालेले आहेत. सुट्ट्यांचा कालावधी असल्याने रेल्वे तिकीटही मिळत नसल्याने पर्यटकांना नाईलाजाने वाढीव दराने विमान प्रवासासाठी नोंदणी करावी लागत असल्याचे चित्र आहे.