नाशिक – सातपूर गोळीबार प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे यांची रविवारी न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर अंबड पाेलिसांनी एका गुन्ह्यात दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा एकच्या वतीने भाईंदर येथून लोंढे टोळीतील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याला २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सातपूर येथील हॉटेलमधील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी प्रकाश लोंढेसह त्याचा मुलगा दीपक आणि अन्य नऊ गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण पोलीस कोठडीत असून मुख्य सूत्रधार भूषण लोंढे अद्याप फरार आहे. आतापर्यंत लोंढे पिता-पुत्राच्या पोलीस कोठडीत तीन वेळा वाढ झाली आहे. यादरम्यान, लोंढेच्या घराची झडती घेतली असता भुयार आढळले. त्या ठिकाणी दोन कुऱ्हाड तसेच चाकु सापडला. १७ ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आतापर्यंत सातपूर गोळीबार प्रकरणात प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, संतोष पवार, अमोल पगारे, देवेश शिरताटे, शुभम गोसावी यांच्यासह सनी विठ्ठलकर याला ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, सातपूर गोळीबार प्रकरण तसेच अंबड येथील एका खंडणीच्या तक्रारीत पोलिसांना हवा असलेला निखिलकुमार निकुंभ (४१, रा. खुटवडनगर) याला अंबड गुन्हे शाखेच्या वतीने ठाणे येथील मिरा भाईंदर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, उपआयुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त संदीप मिटके, गुन्हे शाखेचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
निखिलकुमार सराईत गुन्हेगार
गुन्हे शाखा अंबडने ताब्यात घेतलेला निखिलकुमार हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर सरकारवाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिकरोड, घोटी, सातपूर, अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो सातपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी कारवाई सुरू केल्यापासून फरार होता.
लोंढेचा दुसरा बंगलाही उद्ध्वस्त होणार
सातपुर येथील हाॅटेलमधील गोळीबार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे याच्या अनधिकृत घराची पोलिसांनी झडती घेतली. त्यानंतर त्याची एक इमारत अनधिकृत म्हणून महापालिकेच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आली. आता महापालिकेच्या वतीने त्याच्या दुसऱ्या बंगल्याला नोटीस चिकटवत सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे व अन्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई सुरू केली आहे.