नाशिक – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेतून (उद्धव ठाकरे) अनेक माजी नगरसेवकांनी मुख्यत्वे शिंदे गटात आणि काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीपर्यंत ठाकरे गटात कोणीही राहणार नसल्याचा दावा सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाकडून होत असताना ठाकरे गटाने दिवाळीत भाजपला हलकासा का होईना धक्का दिला आहे. प्रभाग क्रमांक २० मधील भाजपच्या माजी नगरसेविका आणि अन्य प्रभागातील काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला.
गतवेळी महापालिकेत एकसंघ शिवसेनेचे ३५ नगरसेवक होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर माजी नगरसेवकांच्या पळवापळवीला जोर आला. जवळपास २५ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. या स्पर्धेत भाजपही मागे राहिला नाही. ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करणे पसंत केले. या घटनाक्रमाने ठाकरे गटाची ताकद स्थानिक पातळीवर कमी झाली. ठाकरे गटात कुणीही शिल्लक राहणार नसल्याचे दावे सत्ताधारी पक्षांचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांकडून केले जात होते. महापालिका निवडणुकीची घटीका समीप येत असताना राजकीय समीकरणे बदलत आहेत. ठाकरे गटातील नगरसेवकांना आपल्याकडे खेचून ताकद वाढविणाऱ्या सत्ताधाऱ्यांना ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धक्का दिला. भाजपला खिंडार पाडत माजी नगरसेविका संगिता गायकवाड, त्यांचे पती तथा भाजपचे पदाधिकारी हेमंत गायकवाड, गोखले शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ. लक्ष्मण शेंडगे यांच्यासह भाजपच्या काही वॉर्डातील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उभयतांच्या हाती भगवा ध्वज देत मनगटी शिवबंधन बांधून भाजपच्या माजी नगरसेविका व पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. याप्रसंगी खा. संजय राऊत, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, महानगर प्रमुख प्रथमेश गीते आदी पदाधिकारी उपस्थित होते. माजी नगरसेविका संगिता गायकवाड, हेमंत गायकवाड हे पूर्वी एकसंघ शिवसेनेत होते. पुढे त्यांनी मनसेत प्रवेश केला. मनसेतून संगिता गायकवाड नगरसेविका म्हणून निवडून गेल्या. त्यापुढील निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गतवेळी त्या भाजपच्या नगरसेविका होत्या. प्रवेश सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत सर्वांचे स्वागत केले. यावेळी ते फारसे काही बोलले नाहीत, असे कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, ऐन दिवाळीत शिवसेनेत (उध्दव ठाकरे) भाजपमधून माजी नगरसेविकेसह काही पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना काहीसे हायसे वाटले असेल. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या प्रवेशाला महत्व दिले जात आहे. यापुढे ठाकरे गटात परतणाऱ्यांची संख्या वाढण्याची पदाधिकाऱ्यांना आशा आहे.