नाशिक – इंदिरानगर येथील नाशिक केंब्रिज शाळेत बॉम्ब ठेवल्याच्या निनावी मेलमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतून घरी पाठविण्यात आले. विद्यार्थ्यांना थेट प्रवेशद्वाराबाहेर सोडून दिल्यामुळे पालकांनी शाळा व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला. पोलिसांनी संपूर्ण शाळेची तपासणी करुन बॉम्ब नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मध्यरात्री शाळेला एक इ मेल प्राप्त झाला होता. या मेलनुसार शाळेचे शौचालय तसेच आवारात तीन बॉम्ब ठेवले असून लवकरात लवकर शाळेतून विद्यार्थ्यांना काढावे, असे म्हटले होते. शाळेत जवळपास तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानात नेण्यात आले. या मेलबाबत शाळेने इंदिरानगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले.
दरम्यानच्या काळात शाळेकडून लघुसंदेश पाठविला गेल्यानंतर पालक शाळेत पोहोचले. प्रवेशद्वारावर गर्दी झाल्यामुळे काही काळ गोंधळ झाला. धावपळीत काही जण चिखलात पडल्याचे सांगितले जाते. शाळेने सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना घरी पाठविले. बस आणि खासगी वाहनाने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसमध्ये आणि वाहनांमध्ये बसवून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आल्याचे काही शिक्षकांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी शाळेतील प्रत्येक वर्ग, परिसर, मैदान आणि संशयास्पद जागांची तपासणी केली. प्राथमिक तपासात बॉम्ब असल्याचे आढळून आले नाही. यामुळे शाळा व्यवस्थापनासह पालकांचा जीव भांड्यात पडला. या घटनेमुळे विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे इ मेल पाठविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी पालकांनी केली. पोलिसांनी त्या अनुषंगाने शोध सुरू केला आहे.
शाळेचे म्हणणे काय ?
शाळेला प्राप्त झालेल्या मेलमध्ये शौचालय आणि आवारात तीन बॉम्ब ठेवले असून लवकरात लवकर शाळेमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढावे, असे म्हटले होते. या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक दाखल झाले. दरम्यानच्या काळात सुरक्षा उपाय म्हणून पालकांना सूचित करून विद्यार्थ्यांना शाळेतून घरी पाठविण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोध पथकाने संपूर्ण शाळेची तपासणी केली. त्यांना आक्षेपार्ह असे काही आढळून आले नसल्याचे नाशिक केंब्रिज शाळेने निवेदनात म्हटले आहे.