नाशिक – शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) उपनेते सुनील बागूल यांच्याविषयी समाज माध्यमात चित्रफिती प्रसारित केल्याच्या रागातून टोळक्याने घरात शिरून मारहाण केल्याच्या तक्रारीनंतर उपनेते सुनील बागूल, महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यासह सात जणांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घडामोडीनंतर ठाकरे गटही आक्रमक झाला आहे.
तक्रारदार हा पोलीस नोंदीतील गुन्हेगार असून समाज माध्यमातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची बदनामी करणे, व्यापारी, व्यावसायिकांना धमकावून संबंधितांकडून खंडणी वसूल करणे, अशी कामे करीत असल्याची तक्रार ठाकरे गटाने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
प्रारंभी किशोर उर्फ गजू घोडके (४९, काठे गल्ली) यांनी तक्रार दिली. ठाकरे गटाचे उपनेते बागूल यांच्या गैरव्यवहाराबाबत समाज माध्यमात तक्रारदाराने चित्रफित प्रसारीत केली होती. नवनियुक्त महानगरप्रमुख राजवाडे यांनी ती चित्रफित काढून टाकण्यास सांगितल्यावरही घोडके यांनी ती काढली नाही. त्यामुळे बागूल यांच्या सांगण्यावरून सहा ते सात जणांचे टोळके आपल्या घरी आले.
घराचा दरवाजा तोडून संशयितांनी हत्यारे आणि दगडविटांनी मारहाण करून जखमी केले. घरातील संसारोपयोगी साहित्याची तोडफोड करीत चार लाखांचे नुकसान केल्याचे घोडके यांनी तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी घोडके यांच्या गळ्यातील सोनसाखळी, घरात ठेवलेले एक लाख रुपये टोळक्याने चोरल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयितांमध्ये ठाकरे गटाचे उपनेते बागूल यांच्यासह महानगरप्रमुख राजवाडे, सागर देशमुख, अमोल पाटील, लखन दोंदे, लखन झुरड्या, विलास सनसे (सर्व रामवाडी, भद्रकाली) यांचा समावेश असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी लखन दोंदे आणि लखन झुरड्या यांना अटक केली आहे.
यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारदार घोडकेविरुध्द पोलीस आयुक्तांकडे निवेदन दिले. घोडके हा पोलीस नोंदीतील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. हत्या प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षाही सुनावली असल्याकडे लक्ष वेधत घोडकेविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली. अनेक वर्षांपासून घोडके समाजमाध्यमातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची बदनामी करीत आहे. व्यापारी, बांधकाम व्यावसायिक तसेच इतर व्यावसायिकांना धमकावून संबंधितांकडून खंडणी वसूल करतो.
बागूल यांच्याविषयी अवमानकारक चित्रफित प्रसारित करून घोडके खंडणी मागण्याच्या प्रयत्नात होता. खोट्या माहितीच्या आधारे अनेकांना त्याने असाच त्रास दिला आहे. घोडके विरोधात खंडणी, फसवणूक, बदनामी करणे व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गिते यांनी केली आहे.