नाशिक – कोणत्याही खात्याचे महत्व कमी नसते. मंत्रीपद हे जनतेची सेवा करण्याचे एक माध्यम असते. नवे कृषिमंत्री ग्रामीण भागातून आले आहेत. त्यांना त्यांच्या खात्यातील बारकावे माहिती आहेत. त्यामुळे ते या खात्याला न्याय देतील, असा विश्वास अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
भुजबळ यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाविषयी निर्णय घेण्यास सक्षम आहेत. सर्वच खाती चांगली असतात. विरोधक माणिक कोकाटे यांचा राजीनामा मागत आहेत. मला अन्न व ग्राहक संरक्षण खाते मिळाल्यावर अनेकांनी भुजबळांची अधोगती झाली, असे म्हटले होते. परंतु, करोना काळात अन्न व नागरी खात्याने सर्व अडचणी सोडवित सर्वांपर्यंत पाेहचण्याचे काम केले. कुठेही तक्रार आली नाही. आपण लोकांची सेवा करू शकलो याचे समाधान वाटते, असे भुजबळ यांनी नमूद केले.
महायुतीत मित्रपक्षांना लक्ष्य केले जात आहे असे नाही. काही वेळा भाजपचेही मंत्री, पदाधिकारी लक्ष्य होत आहेत. कोणालाही मुद्दाम लक्ष्य केले जात नाही, असा दावाही त्यांनी केला. योग्य वेळ येईल तेव्हां मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री जाहीर करतील, असेही त्यांनी सांगितले.
कारागृहात राहिल्याने होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण ?
भुजबळ यांनी मालेगाव बाॅम्बस्फोट निकालाविषयीही प्रतिक्रिया दिली. या आठ ते दहा दिवसात दोन मोठ्या खटल्यांचे निकाल लागले. अनेक वर्षानंतर न्यायालयाला कळते की त्यामध्ये काही तथ्य नाही. त्यामुळे एक तर पोलीस तपास बरोबर झाला नाही किंवा व्यवस्थेत काहीतरी कमतरता आहे, असे म्हणावे लागेल. आजही न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास आहे. मात्र पाचपेक्षा अधिक वर्षे कारागृहात राहिल्यानंतर त्या व्यक्तीचे जे सामाजिक, आर्थिक नुकसान होते, त्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला. मी स्वत: दोन वर्ष कारागृहात राहिलो आहे. मनस्ताप सहन करावा लागला, असे त्यांनी नमूद केले.