नाशिक – मुंबई येथे मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरु झाल्यानंतरही ओबीसी नेते छगन भुजबळ शांत होते. जरांगे यांनीही त्यांच्यावर टीका करणे टाळले होते. भुजबळ आणि जरांगे यांच्यातील वाकयुध्द जणू थांबल्यात जमा झाले होते. परंतु, जरांगे यांचे आंदोलन संपविण्यासाठी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर काढला. आणि काही महिन्यांपासून शांत असलेले भुजबळ खवळले. भुजबळ यांनी या जीआरवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर मनोज जरांगे यांनीही त्यांना उत्तर दिले. त्यामुळे भुजबळ-जरांगे वाकयुध्दाचा नवीन अंक सुरु झाला आहे.

मुंबईतील मराठ्यांच्या आंदोलनानंतर शासन निर्णय जाहीर झाल्यावर आता हा विषय संपला असे सर्वांना वाटत होते. परंतु, त्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी समाजाचे वेगवेगळे नेते आपआपली भूमिका मांडत आहेत. ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवे का, हे राज्यातील मराठा नेत्यांनी आणि मंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन केले. पूर्वी खुल्या प्रवर्गात असलेल्या मराठा समाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० टक्के आरक्षण दिले.

आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासांसाठी हे १० टक्के आरक्षण होते. यानंतर राज्यात मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आले. असे असतानाही आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन केले जात असल्याने भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. मराठा समाजाला १० टक्के इडब्लूएस, राज्य सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण आणि खुल्या प्रवर्गाचे यापैकी कोणतेही आरक्षण नको का , असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

इडब्लुएस आरक्षणात मराठा समाजाचा ८० ते ९० टक्के इतका वाटा आहे. खुल्या प्रवर्गातही ५० टक्के मराठा समाज आहे. असे असताना तुम्हांला फक्त ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे का, असे प्रश्न विचारुन भुजबळ यांनी मराठा समाजाचे केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार यांच्याकडून उत्तराची अपेक्षा केली आहे.

कोणी रस्त्यावर उतरण्याची भाषा करत असेल तर ओबीसी समाज देखील एकत्र येऊ शकेल. या देशात लोकशाही आहे. अजून जरांगेशाही यायची आहे. आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान असल्याने इथे जरांगेशाही येणार नाही, असा टोलाही भुजबळ यांनी जरांगे यांना हाणला.

भुजबळ यांच्या आरोपांना मनोज जरांगे यांनीही उत्तर दिले आहे. लोकशाही मार्गाने आम्ही सर्व मिळवणार आहोत. तुम्हांला काय करायचे ते करा, असे आव्हान त्यांनी भुजबळ यांना दिले. भुजबळ यांच्या प्रत्येक गावात जमिनी आहेत. भुजबळांनी गोरगरीब ओबीसींना वेड्यात काढले आहे. ओबीसींनी शहाणे व्हावे, त्यांच्या नादी लागू नये, असे आवाहन जरांगे यांनी केले.

एकंदरीतच, दिवसेंदिवस भुजबळ-जरांगे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.