नाशिक – पोलिसांनी गुन्हेगारीचा नायनाट करण्याचा निर्धार केल्यास काय होऊ शकते, हे आठवड्यापासून नाशिक शहर अनुभवू लागले आहे. या वर्षातील हत्यांची संख्या ४५ पर्यंत पोहचल्यावर आणि सर्वसामान्य नाशिककरही ओरड करु लागल्यावर शहर पोलिसांनी दिवाळीआधीच फटाके फोडण्यास सुरुवात केली आहे. गल्लीबोळातील कोणी ऐरागेरा नव्हे तर, या शहराचे बाॅस आपणच असल्याचे पोलिसांनी दाखवून दिल्याने राजकीय नेते, पुढाऱ्यांच्या छत्रछायेखाली पोसलेल्या गुन्हेगारांना खऱ्या अर्थाने धडकी भरली असेल. नाशिककर कित्येक महिन्यांपासून पोलिसांचे हे रुप पाहण्यासाठी आसुसलेले होते. उशिरा का होईना, नाशिक पोलिसांना जाग आल्याने त्यांचे स्वागतच होत आहे.

नाशिकची गुन्हेगारी ही कायमच राजकीय पाठबळामुळेच फोफावल्याचे वारंवार उघड झाले आहे. गुन्हेगार हा कायमच आपल्या बचावासाठी सत्ताधारी पक्षाशी सलगी करीत असतो. त्यामुळे साहजिकच जे सत्तेतील पक्ष असतात, त्यांच्याकडे गुन्हेगारी कारवायांशी संबंधित मंडळींची अधिक ओढ असते. कधी सामाजिक कार्यकर्ता, कधी नगरसेवक, असे वेगवेगळे अवतार ही मंडळी धारण करीत असतात. एखाद्या लोकप्रतिनिधीचा वरदहस्त असल्यावर या मंडळींची भीड चेपते. त्यांचे लुंगेसुंगेही मग दादा, भाई म्हणून वावरण्यास सुरुवात होते. त्याची झळ कधीकधी पोलिसांनाही बसते. काही महिन्यांपासून नाशिक शहर गुन्हेगारीच्या आगीत होरपळत असताना पोलीस काहीच का करीत नाहीत, हा प्रश्न सर्वसामान्यांना चक्रावून सोडत होता.

रस्त्यांवर लुटमार, हाणामाऱ्या, भरदिवसा गोळीबार, तलवारी, कोयते बाहेर निघत असताना या मंडळींना पोलिसांचे भय वाटत नाही का, असा प्रश्न पडणे साहजिकच. उशिरा का होईना, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी रौद्रावतार दाखविण्यास सुरुवात केली आहे. परंतु, त्यासाठी आधी शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि मनसे यांचा गुन्हेगारीविरुध्द संयुक्त मोर्चा, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री दादा भुसे यांची सूचना, नंतर खुद्द भाजपच्या तीनही आमदारांनी भेट घेणे, याची वाट का पाहावी लागली ?

आठवड्यापासून पोलीस आयुक्तांनी सुरु केलेला धडाका याआधीच केला असता तर, नाशिककर त्यांना डोक्यावर घेऊन नाचले असते. याआधीही ज्यांनी ज्यांनी गुन्हेगारांविरुध्द कठोर कारवाई केली, अशांना नाशिककरांनी पाठबळच दिले आहे. मग ते नाशिकमधील शेवटचा एन्काउंटर ज्यांच्या कार्यकाळात झाला ते तत्कालीन आयुक्त विष्णुदेव मिश्रा असोत, टिप्पर गँगला सोलून काढणारे कुलवंतकुमार सरंगल असोत. किंवा भूमाफियांविरुध्द कठोर कारवाई करणारे दीपक पांडे असोत. पोलीस आयुक्तांनी भाषणबाजीत अधिक न रमता रस्त्यावर अधिक रमावे, हीच नागरिकांची अपेक्षा असते. त्यामुळेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पेठरोडवरील कारवाईप्रसंगी आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल उंचावताना पाहून नाशिककरही सुखावले. शेवटी, कोणालाही मुळूमुळू भूमिका घेणारा पोलीस अधिकारी नको असतो. अर्थात, अशी भूमिका घेणारा अधिकारी गुन्हेगार आणि राजकारण्यांनाच हवा असतो. गुंडांमध्ये आणि गुंडांना पोसणाऱ्या राजकीय मंडळींमध्ये पोलिसांची दहशत आवश्यकच आहे. कोणत्याही राजकीय दबावाची पर्वा न करता आणि कोणता गुन्हेगार, कोणत्या पक्षाशी संबंधित, त्याची फिकीर न करता पोलीस आयुक्तांनी अशीच धडाकेबाज कारवाई यापुढेही सुरु ठेवण्याची आवश्यकता आहे.