नाशिक : सराफी दुकानावर दरोडा टाकण्यासाठी एकाने बंदूक दुकानातून पिस्तूल हिसकावून पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. सीसी टिव्ही चित्रणाच्या आधारे माग काढत पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तुलीसह लॅपटॉप व भ्रमणध्वनी असा सुमारे एक लाखहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोन पथकाने ही कामगिरी केली.

अंकुश पारधी (२४, अंजनेरी, मुळेगाव, त्र्यंबकेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या संदर्भात गुरूमितसिंग वधवा (श्रीरामपूर, अहिल्यानगर) यांनी तक्रार दिली. वधवा हे नाशिक-पुणे रस्त्यावरील विजय ममता चित्रपट गृहासमोरील सिंग गन हाऊस या बंदूक घर दुकानात व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. गेल्या रविवारी सायंकाळी ही घटना घडली होती. पिस्तुल खरेदीच्या बहाण्याने संशयित युवक दुकानात आला.

वधवा हे त्याला एअर रिव्हॉव्हर दाखवत होते. सुमारे ५० हजार रुपयांची ही पिस्तूल बघत असताना संशयिताने वधवा यांच्या हातातून ती हिसकावून पलायन केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. सीसी टिव्ही यंत्रणेच्या तपासणीत एक व्यक्ती पिस्तूल घेऊन पळून जात असल्याचे दिसून आले. आसपासच्या सीसी टीव्ही चित्रणाची पाहणी करण्यात आली. संशयिताचा शोध सुरू असताना युनिटचे उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे व अंमलदार संजय पोटींदे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. टी शर्ट परिधान केलेल्या युवकाकडे पिस्तूल असून तो मेट्रो मॉल कडून शिवाजीनगरच्या दिशेने पायी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा लावून संशयितला ताब्यात घेतले. संशयिताने सराफी दुकानात दरोडा टाकण्यासाठी बंदूक घर दुकानातील कर्मचाऱ्याच्या हातातील पिस्तूल हिसकावून पलायन केल्याची कबुली दिली. संशयित अंकुश पारधीकडून पिस्तुल एअरगन, तिचे साहित्य, लॅपटॉप, भ्रमणध्वनी असा एक लाख एक हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. उपरोक्त कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी हेमंत तोडकर, सहाय्यक निरीक्षक डॉ. समाधान हिरे, उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, यशवंत बेंडकोळी, जमादार विलास गांगुर्डे, हवालदार नितीन फुलमाळी, चंद्रकांत गवळी आदींच्या पथकाने केली. संशयितास मुद्देमालासह उपनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.